Wed, Jun 03, 2020 21:25होमपेज › Nashik › पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

Published On: Oct 26 2018 5:51PM | Last Updated: Oct 26 2018 5:51PMपंचवटी (नाशिक) : वार्ताहर 

तीन खुनातील संशयित आरोपी जया दिवे याची जामिनावर सुटका झाली असता, त्याच्या साथीदारांनी सिद्धी टॉवर इमारतीच्या गच्चीवर तसेच गच्चीवरून खाली फटाके फेकून नागरिकांना त्रास दिला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करून न्यायालयाला देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने दिवेसह त्याची सासू, मेव्हणी आणि साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आला. तर यातील आठ आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची परिसरातून धिंड काढण्यात आली. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  

खून, दरोडा, खंडणी, मोक्का अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेला जया दिवे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्याची रवानगी कारागृहात केली होती. त्याच्या साथीदारांनी न्यायालयातून त्याला जामीन मिळविला होता. काल, २५ ऑक्टोंबरला दिवे यांची जामिनावर सुटका झाली. याबद्दल त्यांच्या समर्थकांनी सिद्धी टॉवर या इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडले. तसेच फटाके गच्चीवरून रस्त्यावर देखील फेकले. याचा त्रास नागरिकांना झाल्याने त्यांनी याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याला फोनवरून घटनेची माहिती दिली. 

पंचवटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विचारणा केली असता, जया दिवे याने तुम्हाला आम्हाला विचारायचा काय अधिकार आहे असे म्हणत गिरमे याना धक्काबुक्की केली. तर दिवे याची मेव्हणीने पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याच वेळी दिवे याने दीपक गिरमे यांना तुला पाहून घेतो, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी  देत मारहाण केली. 

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांना आणि न्यायालयाला शिवीगाळ केली म्हणून तसेच पोलीस अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संशयित आरोपी जयेश हिरामण दिवे, विक्की कीर्ती ठाकूर,भूषण कपिल चौधरी,गणेश नंदू परदेशी,मयूर शिवाजी खैर,अक्षय सुधीर बोराडे,मेव्हणी प्रियंका मस्तकीन शेख,सासू विजया राजेंद्र खरात याना पोलिसांनी अटक केली आहे . तर आरोपींची आज, शुक्रवार दि २६ रोजी दिंडोरी नाका,पंचवटी कारंजा,इंद्रकुंड,मालेगाव स्टॅण्ड आदी परिसरातून धिंड काढली.

सराईत गुन्हेगार जया दिवे ,त्याची मेव्हणी,सासू आणि साथीदारांनी पोलीस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे . तसेच न्यायालयाला देखील घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली आहे . याबाबत आम्ही कठोर पावले उचलणार आहे . तसेच,न्यायालयाने याना दिलेला जामीन नामंजूर करावा यासाठी देखील प्रयत्न करणार आहे .    लक्ष्मीकांत पाटील,पोलीस उपायुक्त 

पोलीस अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडाना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ . यापुढे अशा प्रकारे कोणत्याही गुंडाने पोलिसांना अथवा सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कडक कारवाई करीत कारागृहात पाठविणार यात शंका नाही .तसेच,या सराईत गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर देखील कारवाई करणार असून अनेक आरोपींचे तडिपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.   मधुकर कड,वरिष्ठ निरीक्षक,पंचवटी