Tue, May 26, 2020 13:01होमपेज › Nashik › खडसेंना पंतप्रधान व्हावे असेही वाटेल! : महाजन 

खडसेंना पंतप्रधान व्हावे असेही वाटेल! : महाजन 

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 06 2018 1:53AMनाशिक : प्रतिनिधी

एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार त्यांना मुख्यमंत्री बनण्याची मनीषा असेल. उद्या त्यांना पंतप्रधान व्हावे, असेही वाटेल, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला. तसेच, कोणालाही काही वाटत असले तरी पक्ष नेतृत्वच अंतिम निर्णय घेते, हे सांगण्यास महाजन विसरले नाहीत. दरम्यान, राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला कोणताही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेल्या महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठतेनुसार राज्याचा मुख्यमंत्री मीच होणे अपेक्षित होते. या खडसेंच्या वक्तव्याचा महाजन यांनी यावेळी समाचार घेतला. खडसेंचे विधान मी वर्तमानपत्रामध्येच वाचले. पक्षात खडसे हे ज्येष्ठ नेते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा रास्त आहे. परंतु, शेवटी पक्ष नेतृत्वच अंतिम निर्णय घेत असल्याचे सांगत पक्षात अनेक ज्येष्ठ मंडळी असताना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यात आले. पक्षाची हीच पद्धती दिल्ली ते गल्लीपर्यंत समान आहे. परिणामी, आजही केंद्र व राज्यात अनेक मंत्रालयांत वयाने लहान मंत्र्यांना संधी देण्यात आल्याचे पालकमंत्री महाजन म्हणाले. 

आरक्षणासंदर्भात लवकरच निर्णय 

मराठा आरक्षणावरून राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी होत आहे. आरक्षण देण्याबाबत सरकार योग्य ती पावले उचलत आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे आरक्षण देण्यास वेळ लागत आहे. मात्र, अधिवेशन बोलविण्यापूर्वीच आरक्षणासंदर्भात चांगला निर्णय होईल, असा दावा पालकमंत्री महाजन यांनी केला.