Sat, Sep 19, 2020 10:58होमपेज › Nashik › कांदा तात्पुरता सावरला

कांदा तात्पुरता सावरला

Last Updated: Sep 16 2020 10:49PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्यानंतर कांदा दरात पहिल्या दिवशी 1,200 रुपयांची घसरण झाली होती. तसेच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही कमी झाली होती. दरम्यान, बुधवारी (दि.16) जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याची आवक एक लाख क्विंटलपेक्षा अधिक होऊन सर्वोच्च 3,500 रुपये क्विंटल असा दर मिळाला. कांद्याच्या सरासरी दरात मंगळवारच्या तुलनेत दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे निर्यातबंदीनंतरही कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे दुसर्‍याच दिवशी दिसून आले. मात्र, निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे सोमवारच्या दराशी तुलना करताना क्विंटलमागे साडेचारशे रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर दुसर्‍या दिवशी नाशिक जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. त्यानंतर बुधवारी (दि.16) विविध ठिकाणी शेतकर्‍यांनी, राजकीय पक्षांनी व शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. मात्र, सर्वच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याचे दिसून आले. सरकारच्या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. मात्र, लासलगाव आवारात केवळ 9044 क्विंटल आवक होती. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व बाजार    सम्त्यिांमध्ये दिवसभरात एक लाख पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. सटाणा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च 3,500 रुपये भाव मिळाला. कांदा निर्यातबंदीच्या दिवसाच्या आधी म्हणजे मागील शनिवारी  जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वोच्च दर 3,009 रुपये पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मिळाला होता. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, पिंपळगाव बसवंत, नामपूर, येवला, अंदरसूल येथे कांद्याला सर्वोच्च दर तीन हजार रुपयांपेक्षा अधिक मिळाला. तसेच सरासरी दरही क्विंटलला 2,100 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान होते. यामुळे निर्यातबंदीनंतर उठलेल्या वादळानंतही कांद्याचे दर पुन्हा सावरत असल्याचे दिवसभरात सर्व बाजार समित्यांमध्ये दिसून आले.

निर्याबंदीनंतरही वाढ

निर्यातबंदीनंतरही दोनच दिवसांत कांद्याच्या दरात पुन्हा वाढ दिसून आली आहे. यामुळे मागील वर्षाप्रमाणेच कांद्याचे दर निर्यातबंदीनंतर वाढतील, असा अंंदाज वर्तवला जात आहे. यावर्षी आतापर्यंत विक्री झालेला कांदा, चाळींमध्ये साठवलेला कांदा व चाळींमधील कांद्याच्या नुकसानीचे प्रमाण बघता मागणीच्या तुलनेत कांदा उपलब्धतेचे प्रमाण कमी असल्यामुळेच कांद्याच्या दरातील तेजी कायम असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

 "