Wed, Jun 03, 2020 22:33होमपेज › Nashik › धुळे : जैन मंदिरातील चोरी प्रकरणी मध्य प्रदेशातील टोळी अटकेत

धुळे : जैन मंदिरातील चोरी प्रकरणी मध्य प्रदेशातील टोळी अटकेत

Published On: Jan 02 2019 2:48PM | Last Updated: Jan 02 2019 2:45PM
धुळे : प्रतिनिधी

धुळे तालुक्यातील नेर येथील जैन मंदिरातील ८ लाख ३५ हजाराचे दागिने चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीस अटक करण्यात आली आहे. तर या टोळीने विकलेली चांदी सोनारकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी दिली.

नेर येथील जैन मंदिरात १२ ऑगस्टला चोरी झाली होती. मंदिराचे व तिजोरीचे कुलूप तोडून दागिने लांबवले होते. या चोरीचा तपास पोलिस करीत होते. आज या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.  सेंधवा येथील गौतम उर्फ शोभराम खुमसिंह भिलाला, राधु बांगड्या डावर, गंगाराम उंदऱ्या भांगड्या, झिना अमरसिंह डावर, गणेश उर्फ दगड्या नंदला सोळंकी, डुडल्या उर्फ गंगाराम केऱ्या सोळंकी, मन्या उर्फ मोहन भुरला भिलाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने मध्य प्रदेशातील एका सोनारास ही चांदी विकली होती. त्या सोनारकडून १ लाख रुपये किमतीची १० किलो चांदी जप्त केली आहे. 

या टोळीतील डुडल्या सोळंकी हा नेर गावात एका शेतकऱ्यांकडे कामास लागला होता. या काळात त्याने मंदिराची रेकी करून ही माहिती त्यांच्या म्होरक्याला कळवली. त्या नंतर तो धमाणे गावात कामास गेला. यानंतर या टोळीने मंदिरात चोरी केली. टोळीतील आणखी दोन जण फरार आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.