Wed, Jun 03, 2020 07:46होमपेज › Nashik › दलाली संपवून शेतकर्‍यांना बळ देणार

दलाली संपवून शेतकर्‍यांना बळ देणार

Published On: Apr 22 2019 5:11PM | Last Updated: Apr 22 2019 5:11PM
नाशिक : प्रतिनिधी

काँग्रेसचे शेतकर्‍यांविषयी प्रेम हे बेगडी आहे. त्यांनी नेहमीच दलालांना पोसण्याचे काम केले आहे. काँग्रेसची हीच दलाली मोडीत काढून शेतकर्‍यांचे हात मजबूत करण्यासाठी ‘ग्राहक ते शेतकरी ’अशी थेट साखळी तयार करून दलालीचा नायनाट करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.22) केली. तसेच येत्या 10 वर्षांत एचएएलची उत्पादन क्षमता दुपटी- तिप्पटीने वाढविण्याची ग्वाही देत याविषयी काँग्रेसकडून होणार्‍या आरोपांना त्यांनी याप्रसंगी चोख प्रत्युत्तर दिले. 

नाशिक आणि धुळे येथील शिवसेना- भाजपा युतीच्या पिंपळगाव बसवंत येथील विजय संकल्प सभेत ते बोलत होते. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत अनेक विषयांवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, भाजपा एकीकडे देशाची सुरक्षितता, भ्रष्टाचार, घराणेशाहीबरोबरच विकासाची भाषा करत आहे. आपली ही चर्चा ऐकून विरोधकांना विजेचा झटका बसत असल्याने त्यांची भाषा आता घसरू लागली आहे. आधी ते 50 शिव्या द्यायचे. आता 100 शिव्या देऊ लागले आहेत. देशात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील दहशतवाद संपुष्टात आला असून, केवळ कश्मीर खोर्‍यापुरता मर्यादित राहिला आहे. तेेथेही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेत ईस्टर संडेच्या पवित्रदिनी शांततेचा संदेश दिला जात दहशतवादरूपी राक्षसांनी साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंकेला हादरवून सोडले.

2014 नंतर देशातील मुंबई, पुणे, हैदराबादसह कुठेही दहशतवादी हल्ले झाले नाहीत. यापूर्वीचे काँग्रेसचे सरकार केवळ पाकिस्तानविरुद्ध गळे काढून आणि शोक व्यक्त करत होते. परंतु, देशात भाजपाचे सरकार आल्यानंतर तुमच्या या चौकीदाराने काँग्रेसचे डरपोक धोरण बदलून दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान आणि दहशतवाद्यांमध्ये वचक निर्माण झाला असून, देशाकडे आता वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत राहिलेली नाही. देशाच्या सुरक्षिततेबरोबरच आम्ही विकासालाही प्राधान्य दिले आहे. ग्रामीण रस्ते, वीज, डिजिटल व्यवहार यांना प्रोत्साहन दिले जात आहे. आज भारत एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. जगात देशाची ओळख ताकदवान देश म्हणून होऊ लागली आहे. याचमुळे आज आपण इतर देशांसमोर नजरेला नजर मिळवून आणि छाती गर्वाने फुगवून चर्चा करू शकतो. ही सर्व ताकद केवळ मोदी नव्हे, तर सामान्य जनतेची ताकद आहे. प्रत्येक गावात रस्ते आणि मोफत विजेचे कनेक्शन दिले जात आहे.

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून गावागावांत बँकेचे व्यवहार सुरू केले आहेत. आदिवासी बांधवांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्था आणि आदिवासींना शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासह खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, राहुल आहेर, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, राजाभाऊ वाजे, महापौर रंजना भानसी, शीतल सांगळे, भाऊसाहेब चौधरी,  विजय करंजकर, सुनील पाटील, केदा आहेर, रामदास चारोस्कर, दादा जाधव, सुरेश पाटील, सुनील बागूल आदी उपस्थित होते.

कृषी अर्थव्यवस्था बळकट करणार  ः नाशिकमधील कांदा, द्राक्ष या नगदी पिकांचा धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले. आपल्या भागातील काही खासदार व लोकप्रतिनिधींनी कांदाप्रश्‍नी आपली भेट घेऊन विविध समस्या सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी काढली. त्यानुसार कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम आपण केले. या पुढील काळातही निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गाव गाव चौकीदार है : भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित सर्वांनाच हात उंचावून ‘मै भी चौकीदार हूँ’ अशी शपथ देत तुम्ही सर्वांनी हिंदुस्तानचे चौकीदार बना, असे आवाहन केले. गाव-गाव, बच्चा-बच्चा, शहर-शहर , बडे बुर्जुग, माता बहेन, कलाकार, लेखक, दुकानदार, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर असे प्रत्येकाने चौकीदाराची भूमिका निभवावी असे सांगत भाषणाचा समारोप केला. 

भाषणाची सुरुवात मराठीतून : व्यासपीठावर मोदी यांचे आगमन होताच उपस्थित हजारो नागरिकांनी मोदी, मोदी आणि मै भी चौकीदार अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वांना हात उंचावून पंतप्रधानांनी थेट मराठीतून भाषण सुरू केले. येथे जमलेल्या सर्व नाशिकवासीयांना माझा नमस्कार. या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो असे सांगत त्यांनी थेट संवाद सुरू केला. मराठीतून सुरू झालेल्या या भाषणामुळे नागरिकांनीही टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांनी मोदी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

एक हॉस्पिटल, एक कॉलेज

प्रत्येक खासदाराच्या लोकसभा मतदारसंघात एक रुग्णालय, एक मेडिकल कॉलेज सुरू करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशातील दीड लाख गावांमध्ये अत्याधुनिक आरोग्य केंद्रे उभारली जाणार आहेत. महामार्गांचा दुप्पट गतीने विस्तार होत आहे. नाशिकसारखी शहरे एअर कनेक्टिव्हिटीने जोडली जात आहेत. भाजपाने शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केल्याच्या विरोधकांच्या आरोपांचाही पंतप्रधानांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

मल्टी लॉजिस्टिक पार्क साकारणार 

नाशिक, जालना, वर्धा, सांगली आणि हिंगोली येथे मल्टी लॉजिस्टिक पार्क निर्माण करून निर्यातीला आणि प्रक्रिया उद्योगांना गती दिली जाणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे सरकार आल्यानंतर लगेचच पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पाच एकरची अट शिथिल करून या योजनेचा लाभ सर्वच शेतकर्‍यांना देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच दिले जात असताना काँग्रेस 72 हजारांची घोषणा करून दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.