Wed, Jul 08, 2020 03:18होमपेज › Nashik › चांदवड शस्त्रसाठा प्रकरणात आणखी एक गजाआड

चांदवड शस्त्रसाठा प्रकरणात आणखी एक गजाआड

Published On: Dec 18 2017 2:39AM | Last Updated: Dec 17 2017 11:31PM

बुकमार्क करा

चांदवड : वार्ताहर

उत्तर प्रदेशातील बांदा येथील आर्मच्या दुकानात शस्त्रसाठ्याची चोरी करून मुंबईच्या दिशेने पलायन करणार्‍या मुख्य संशयित आरोपी बादशहासह दोघांना गुरुवारी रात्री चांदवड पोलिसांनी चांदवडच्या मंगरूळ टोलवर अटक केल्यानंतर फरार साथीदारांपैकी एकाला शनिवारी (दि.16) मध्यरात्री मुंबईच्या शिवडी भागातून अटक करण्यात आली. नाशिक ग्रामीणच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयित आरोपीला रविवारी (दि.17) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश के. जी. चौधरी यांनी 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.

उत्तर प्रदेश राज्यातील बांदा येथील आर्मचे दुकान कुख्यात गुन्हेगार असलेला बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमित ऊर्फ सुका याने इतर सहा जणांच्या मदतीने मंगळवारी (दि.12) मध्यरात्री लुटल्याचे पोलीस तपासात जवळपास निष्पन्न झाले आहे. या दुकानातील शस्त्रसाठा बोलेरो गाडीतील (एमएच 01 एसए 7460) चोरकप्प्यात टाकून मुंबई-आग्रा महामार्गाने मुंबईकडे बादशहा, सलमान अमानुल्ला खान (19, शिवडी, मच्छी गोदाम, मुंबई), नागेश राजेंद्र बनसोडे (23, रा. वडाळा मुंबई) हे आणत असताना चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस हवालदार हरिश्‍चंद्र पालवी, उत्तम गोसावी यांनी जिवाची पर्वा न करता बोलेरो गाडी चांदवडच्या मंगरूळ टोल नाक्यावर पकडली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले. चांदवडला सापडलेला संपूर्ण शस्त्रसाठा हा उत्तर प्रदेश राज्यातील बांदा येथील असल्याचे उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर बादशहाच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. 

साब, आपको मेडल जरूर मिलेगा।

साब, आपने बहोत बडा काम किया है, आपको मेडल जरूर मिलेगा। हे उद्गार आहेत, चांदवड येथील शस्त्रसाठा प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मुख्य संशयिताचे... पोलीस अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला संशयिताकडून हे एकच उत्तर मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्याला हादरवून सोडणार्‍या या प्रकरणाच्या तपासाकामी ओझरमध्ये तीन दिवसांपासून तळ ठोकून असणारी तपास यंत्रणा संभ्रमात पडली असून, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास उशीर होत आहे. 

मालेगाव येथील पेट्रोलपंप चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून पोबारा करणार्‍या तीन संशयितांना चांदवड येथील टोल नाक्यावर पकडण्यात आले होते. या संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यातील मुख्य संशयित बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका पाचा याला ओझर येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. हा मुख्य संशयित सराईत गुन्हेगार असून, राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झाले असून, देशभरातल्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी मुख्य तपास यंत्रणा तीन दिवसांपासून ओझर येथे तळ ठोकून आहेत. या गंभीर घटनेची विविध अंगांनी वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असून, याबाबत  गोपनीयता बाळगण्यात येत आहे.