होमपेज › Nashik › येवल्यामध्ये आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा दाखल, नऊ जणांविरोधात कारवाई

येवल्यात आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा दाखल

Published On: Mar 19 2019 1:54PM | Last Updated: Mar 19 2019 2:17PM




येवला : प्रतिनिधी

सतराव्या लोकसभा निवडणुका जाहीर होताच आचार संहिता लागू झाली. आचार संहिता लागू होताच येवला येथे आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना कोणतीही परवानगी न घेता येवला तहसील कार्यालयात उपोषण केल्याप्रकरणी पोलिसांकडून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवार, (दि. १८) रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या आनंदा पानसरे, गणेश बगाटे, रावसाहेब शिंदे, बाळू जोंधळे, आनंदा सोनावणे, सुनिता जोंधळे, बाबासाहेब शिंदे, राजाराम पानसरे, बबन शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण येवला तालुक्यातील मुरमी या गावाचे रहिवाशी आहेत.

येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नऊ जणांनी येवला तहसील कार्यलयाच्या आवारात उपोषण सुरु केले होतं. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी उपोषणकर्त्यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती. याबाबत आचारसंहिता कक्षाचे प्रमुख महसूल विभागाचे अधिकारी विजय रोडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. विजय रोडे यांच्या तक्रारीनंतर येवला शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.