Wed, Aug 12, 2020 02:57होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यात 12 नवे रुग्ण आजवर 903 जण कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात 12 नवे रुग्ण आजवर 903 जण कोरोनाबाधित

Last Updated: May 22 2020 11:35PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : पुढारी वृत्तसेवा 
शहरात 11 आणि मालेगाव येथे एक अशा 12 जणांचा कोरोना अहवाल  शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात 29 मार्च ते 22 मे या 54 दिवसांत एकूण 903 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील 654 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून, 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात या आधी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शुक्रवारी रात्री मिळालेल्या अहवालांनुसार सातपूर अंबड- लिंकरोड येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 7, 11, आणि 13 वर्षीय मुलीसह 13, 18, 49 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच वडाळा गाव येथील साठेनगर परिसरात 46 वर्षीय पुरुषास, तर पेठ रोड येथे 37 वर्षीय पुरुष आणि सिडकोत 47 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर हमीदनगर येथे सातवर्षीय मुलासह 32 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे मालेगाव येथील 47 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 903 झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत नव्याने 51 संशयित रुग्ण जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. 

शहरात 19 प्रतिबंधित क्षेत्र : शहरातील श्रीकृष्णनगर, हिरावाडी, हनुमान चौक, पाटीलनगर, बजरंगवाडी, जाधव संकुल येथील प्रतिबंधित क्षेत्र हटवण्यात आले आहे. तसेच पंचवटीतील राठी संकुल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शहरात 39 पैकी 20 प्रतिबंधित क्षेत्र हटवण्यात आले असून, 19 बाकी आहेत. आठ हजार 240 अहवाल निगेटिव्ह : जिल्ह्यात नऊ हजार 447 अहवाल तपासणीसाठी पाठवले असून, त्यातील आठ हजार 240 अहवाल निगेटिव्ह तर 903 पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 304 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच जिल्ह्यात शुक्रवारी 191 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. तसेच 46 मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात एसटी सुरू

मार्गांवर बसेसचे नियोजन केले होते; मात्र प्रवासीच नसल्याने तेथून बसेस सोडण्यात आल्या नाहीत.   जिल्ह्यातील 4 डेपोंतून 7 बसेसद्वारे 24 फेर्‍या करण्यात आल्या. त्यात 135 जणांनी प्रवास केला. प्रवाशांच्या मागणीनुसार पहिल्या दिवशी सिन्नर, पेठ, इगतपुरी व कळवण येथून बसेस सोडण्यात आल्या. मनमाड, सटाणा, नांदगाव, लासलगाव, येवला, पिंपळगाव येथे एकही प्रवासी नसल्याने 
बसेस धावल्या नाहीत.

मालेगाव आयुक्‍त कोरोनामुक्‍त

मालेगाव :  गेल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झालेले मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्‍त त्र्यंबक कासार यांचा दुसरा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने कासार हे कोरोनामुक्‍त झाले आहेत. दरम्यान, त्यांनी आपण काटेकोरपणे गृह विलगीकरणाचे पालन, योग्य आहार, पुरेसा व्यायाम, काही औषधे व सकारात्मक विचार या पंचसूत्री अवलंबून कोरोनावर मात केल्याचे सांगितले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या मालेगाव दौर्‍याप्रसंगी आयोजित बैठकीतच आयुक्‍त व सहायक आयुक्‍तांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत केलेल्या दुसर्‍या चाचणीत निगेटिव्ह आणि गुरुवारी (दि.21) रात्री आलेल्या तिसर्‍या स्वॅब अहवालाने आयुक्‍त कासार कोरोनामुक्‍त झाल्याचे शिक्‍कामोर्तब केले.

यावेळी ते म्हणाले की, स्वतः निरोगी झालो असलो तरी, संपूर्ण मालेगाव कोरोनामुक्‍त होईल, त्या दिवशी विशेष समाधान लाभेल, असे त्यांनी नमूद केले आहे. शहरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. सर्वांनी माझ्याप्रमाणे सगळ्या नियमांचे पालन केले, पुरेशी काळजी घेतली तर 100 टक्केया आजारावर मात करणे शक्य आहे. अन्यथा आपली बेफिकिरी आपल्या कुटुंबाच्या, मित्रांच्या, शेजार्‍याच्या जिवावर बेतू शकते. प्रशासकीय यंत्रणा शहरवासीयांच्या सहकार्याशिवाय कोरोनाला हद्दपार करू शकणार नाही, असे स्पष्ट करून आयुक्‍त कासार यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी नागरिकांना साद घातली आहे.