Wed, Jun 03, 2020 22:20होमपेज › Nashik › 'मालेगाव बाह्य' मध्ये राज्‍यमंत्री भुसेंना डॉ. शेवाळेंची टक्कर!

'मालेगाव बाह्य' मध्ये राज्‍यमंत्री भुसेंना डॉ. शेवाळेंची टक्कर!

Published On: Sep 26 2019 5:09PM | Last Updated: Sep 26 2019 5:09PM
मालेगाव : प्रतिनिधी

मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा विजय संपादन करणार्‍या ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी आघाडीतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. पक्ष व गटतट बाजूला ठेऊन एकच उमेदवार देऊन भुसेंच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वपक्षियांची मसलत सुरू होती. त्यासाठी आघाडीतर्फे कोअर कमिटी गठीत झाली होती. या कमिटीतील डॉ. शेवाळे, जिल्हा बँकेचे तसेच मामको बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष डॉ. अद्वय हिरे, मविप्रचे संचालक डॉ. जयंत पवार यांनी चर्चेच्या तीन-चार फेर्‍या पूर्ण करित अखेर डॉ. शेवाळे यांच्या नावावर एकमत झाले. 

या कमिटीसमवेत विविध पक्षातील नेत्यांनी गुरुवारी (दि. 26) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईस्थित निवासस्थानी सकाळी भेट घेतली. त्यात कोअर कमिटीने आपला अहवाल अन् डॉ. शेवाळे यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सादर केला. पवार यांनी प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेतले. त्यात प्रत्येकाने पक्ष जो उमेदवार देईल, त्यामागे सर्व ताकद उभी करण्याचा शब्द दिला.  

साधारण 15 मिनिटे चाललेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी डॉ. शेवाळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना पक्षाचे तिकीट मिळणे श्रेयस्कर ठरेल, असे मत नोंदवत मालेगाव बाह्य मतदार संघ काँग्रेसला देण्याविषयीचे संकेत दिलेत. या बैठकीविषयी भोसले यांनी सांगितले की, कोअर कमिटीने डॉ. शेवाळे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव एकमताने ठेवला. आता, त्याविषयी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. बाळासाहेब थोरात आदींची लवकरच बैठक होईल. तरी ‘मालेगाव बाह्य’मधून डॉ. शेवाळे हेच आघाडीचे उमेदवार असतील, हे निश्‍चित. याप्रसंगी माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप पवार, काँग्रेस नेते प्रसाद हिरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरूण देवरे आदी उपस्थित होते.