Tue, Nov 19, 2019 00:05होमपेज › Nashik › नाशिकमधून चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकात सापडला

नाशिकमधून चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकात सापडला

Published On: Feb 02 2019 6:00PM | Last Updated: Feb 02 2019 6:19PM
नाशिक : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्हे पोलिस स्टेशन हद्दीतील नाशिक - मुंबई महामार्गावरील राजुर फाटा येथून काही दिवसांपूर्वी मोठा कंटेनर चोरीस गेला होता. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वाडीवर्हे पोलिसांनी त्याचा शोध घेवून संशयित आरोपीसह कंटेनर कर्नाटकातून ताब्यात घेतला. यामुळे कंटेनर मालक व पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

याविषयी अधिक वृत्त असे की, चेन्नई येथून अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्र. एम.एच.१४ जी.यू.७९९५ ) हा महिंद्रा कंपनीचा माल घेवून राजुर बहुला .जि. नाशिक शिवारातील समर्थ लॉजिस्टिक कंपनी येथे २३ जानेवारीस खाली करण्यासाठी आला होता. 

चालक पोपट संभाजी नरोटे याला नातलगाचा फोन आल्याने त्यास त्वरित पुण्यास जायाचे होते, पण माल खाली होण्यास वेळ असल्याने पोपट नरोटे याने आपला क्लीनर नाजीर अहमद मौलाली मुल्ला (वय : १९) रा. चौडाली, जि. कारवार कर्नाटक याच्याकडे विश्वासाने कंटेनरची किल्ली देवून ताे पुण्यास निघून गेला. क्लीनरने मात्र या संधीचा फायदा घेत कंटेनर घेवून पोबारा केला. दोन दिवसानंतर तो फोन घेत नसल्याने चालकाने येथे येऊन पाहिले असता, कंटेनर आणि क्लीनर दोघे गायब असल्याचे त्‍याच्या लक्षात आले.

त्यानंतर चालक व मालकाने वाडीवर्हे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कंटेनर नवीन असल्याने त्यात जीपीएस प्रणाली होती त्यावरून कंटेनरचे लोकेशन घेतले असता, तो कर्नाटक मध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ कर्नाटकमधील मुंडगोड व बंकापूर पोलिसांशी संपर्क साधत तिथे जात कंटेनरसह आरोपीला ताब्‍यात घेतले. यानंतर वाडिवर्हे पोलिसांच्या लक्षात आले की, या आरोपीने कंटेनरची चाके व टायर चोरुन विकले होते. मात्र पोलिसांनी ते ज्‍याला विक्री केले आहेत त्‍याच्याकडून ते ताब्यात घेतले. असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिस निरिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पो.ना.रूपेश मुळाने, धारणकर, अंबोरे यांच्या पथकाने तपास करत ही कारवाही केली.