होमपेज › Nashik › पत्नीस पेटवून पतीची आत्महत्या

पत्नीस पेटवून पतीची आत्महत्या

Last Updated: Apr 12 2020 11:23PM
चांदवड : पुढारी वृत्तसेवा 

घरगुती भांडणातून पतीने पत्नीचे हात बांधून तिला पेटवून दिले. या घटनेत पत्नी पूर्णतः जळाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नी मयत झाल्याचे बघून पतीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतः पेटवून घेतले. यात तो 95 टक्के भाजला गेल्याने त्याला उपचारासाठी नाशिकला नेत असताना रस्त्यात मूत्यू झाला. या घटनेसंदर्भात मयत महिलेचा भाऊ हिरामण खुरासने याने पोलिसांत मयत पतीविरोधात फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसात मयत कैलास वाघ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

तालुक्यातील साळसाणे येथील कैलास परसराम वाघ (25) व पत्नी मनीषा (23) हे आदिवासी दाम्पत्याचे  दहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर कैलास व पत्नी मनीषा यांच्यात वारंवार भांडण होत असत. रविवारी (दि.12) दुपारी कैलास व मनीषा यांच्यात भांडण झाले. तेव्हा कैलासने पत्नी मनीषाचे हात बंधून तिच्या अंगावर  पेट्रोल ओतून पेटवून दिले. यात पत्नी मनीषा पूर्णतः जळाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नी मयत झाल्याचे पाहून कैलासने स्वतःच्या हाताने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात तो 95 टक्के भाजला गेल्याने त्याला उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला घेऊन जात असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस, हवालदार नरेश सौंदाणे व इतर कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी  भेट देऊन पाहणी केली. मयत महिलेचा भाऊ तुळशीराम खुरासने याने कैलास वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.