Tue, May 26, 2020 11:08होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

Published On: Jul 28 2019 1:36AM | Last Updated: Jul 28 2019 1:36AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात शनिवारी (दि. 27) पावसाने सर्वदूर हजेरी लावली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 597.6 मिमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह पेठ सुरगाण्याला पावसाने झोडपून काढले. भावली धरण ओव्हर फ्लो झाले असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 72 टक्के भरले आहे. ते 80 टक्के भरल्यानंतर विसर्ग केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नाशिक शहरात तिसर्‍या दिवशीही पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी खळाळली. तिचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले. 

जिल्ह्यातील काही तालुके वगळता सध्या समाधानकारक पर्जन्यवृष्टी सुरू आहे. इगतपुरीत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे भावली धरण ओव्हर फ्लो झाले. दारणा धरण 87.36 टक्के भरल्याने त्यातून 16 हजार 598 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर चांगला असून, तेथे शनिवारी दिवसभरात 70 मिमी पाऊस झाला. नाशिकमध्ये तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी,  काठावरील लहान-मोठे सांडवे पाण्याखाली गेले आहेत. शहरात दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 45 मिमी, तर काश्यपीत 33 मिमी पाऊस झाला. गौतमी-गोदावरी धरण क्षेत्रात 55, तर अंबोलीत 61 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या दमदार पावसामुळे गंगापूर धरणात शनिवारी दिवसभरात 345 दलघफू पाण्याची आवक झाली असून, धरणाचा पाणीसाठा 4 हजार 54 दलघफूवर पोहोचला आहे. परिणामी, नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. 

इगतपुरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दारणा धरणात वेगाने आवक होत आहे. दिवसभरात धरणात 571 दलघफू पाण्याची आवक झाली. धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता 16 हजार 598 क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग सुरू होता. भावली धरण शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री 3 वाजता ओव्हर फ्लो झाले. धरणातून 1218 क्युसेक विसर्ग केला जात आहे. तर नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 24 हजार 331 क्युसेक वेगाने पाणी मराठवाड्याकडे झेपावत आहे. 

त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यावरही वरुणराजाची कृपा सुरू आहे. तेथे दिवसभरात 70 मिमी पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले. परिणामी, नागरिकांसह भाविकांचे हाल झाले. जिल्ह्याच्या इतर भागांत मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.  मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, सिन्नर, येवला, देवळा या भागांत अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

गंगापूर 80 टक्के झाल्यावर विसर्ग

शनिवारी (दि. 27) सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत इगतपुरीत सर्वाधिक 212 मिमी पाऊस झाला. नाशिकमध्ये 28, त्र्यंबकेश्वर 140, पेठमध्ये 72.2, तर सुरगाण्यात 34.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गंगापूर धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचल्यावर धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली आहे.