Tue, Jun 02, 2020 12:39होमपेज › Nashik › चुंभळेंच्या जामिनावर उद्या सुनावणी

चुंभळेंच्या जामिनावर उद्या सुनावणी

Published On: Aug 18 2019 1:29AM | Last Updated: Aug 18 2019 1:29AM
नाशिक : प्रतिनिधी

तीन लाखांची लाच स्वीकारतांना अटक केलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवाजी चुंभळे यांना शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चुंभळे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.19) सुनावणी होणार आहे. दरम्यान, चुंभळे यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात 22 तोळे सोने तसेच अडीच लाखांचा विदेशी मद्यसाठा आढळला आहे.  

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात एकास ई-नाम योजनेंतर्गत कंत्राटी कामगार म्हणून नियुक्तिपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारतांना चुंभळे यांना शुक्रवारी (दि.16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुंभळे यांच्या सिडको आणि गौळाणे येथील निवासस्थानांवर छापा टाकून तपासणी केली. त्यात पथकास 22 तोळे सोन्याचे दागिने, विदेशी मद्यसाठा, काही कागदपत्रे, चांदीचे दागिने असा ऐवज आढळला.  चुंभळे यांना शनिवारी (दि.17) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी देखील चुंभळे समर्थकांनी न्यायालयाभोवती गर्दी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडली. चुंभळे यांच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी आहे, त्यांच्या बँकेतील लॉकरची तपासणी करणे, या गुन्ह्यात सहभागी असणार्‍यांचा शोध घेण्याचे काम बाकी असल्याने चुंभळे यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. चुंभळे हे राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने साक्षीदार, तक्रारदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. आम्हाला सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे अ‍ॅड. मिसर यांनी सांगितले. मात्र, हे राजकीय षड्यंत्र असल्याचे तसेच चुंभळे यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे सांगत आणि तपासाचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद चुंभळे यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

जिल्हा रुग्णालयात मुक्काम  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चुंभळे यांना अटक केल्यानंतर त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री नेले. मात्र, वैद्यकीय तक्रार केल्याने त्यांना शुक्रवारी (दि.16) रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि.17) न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर चुंभळे यांनी छातीत कळ येत असल्याची तक्रार केल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे चुंभळे यांचा मुक्काम कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात झाला आहे. दरम्यान, चुंभळे समर्थकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा रुग्णालयातही गर्दी केली होती.