Tue, Jun 02, 2020 13:50होमपेज › Nashik › ऑनलाइन पेमेंटमुळे डोकेदुखी

ऑनलाइन पेमेंटमुळे डोकेदुखी

Published On: Sep 10 2019 1:19AM | Last Updated: Sep 10 2019 12:56AM
देवळा : वार्ताहर

बाजार समित्यांमध्ये सध्या विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे रोख स्वरूपात न देता बँक खात्यावर देण्याच्या शासनाच्या नवीन नियमामुळे शेतकरी, व्यापारीवर्ग, बँक कर्मचारी या सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे. नवीन नियम सर्वांसाठी त्रासदायक असल्यामुळे या नियमाबाबत सर्वत्र तीव्र स्वरूपाच्या नाराजीचा सूर आहे.

बाजार समितीचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच रोखीने सुरू करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरू लागली आहे. नवीन नियम लागू होण्यापूर्वी बाजार समितीमध्ये विक्रीला आलेल्या शेतमालाचे पैसे शेतकर्‍यांना व्यापारी रोखीने देत होते.त्यावर 24 तासांच्या आत पैसे चुकते करण्याचे बाजार समितीचे बंधन असल्यामुळे सर्वत्र व्यवहार सुरळीत चालू होते. व्यवहार रोखीने असल्यामुळे व्यापारीवर्गही आर्थिक उपलब्धतेप्रमाणे जास्त शेतमाल खरेदी करण्याचा हव्यास न करता खरेदी करून सायंकाळपर्यंत रोख स्वरूपात पैसे देऊन त्या-त्या दिवसाचा व्यवहार व्यवस्थित पार पाडत होते. तीन-चार वर्षांपूर्वी ही काही ठिकाणी रोख तर काही ठिकाणी खासगी संबंध सांभाळत बाजार समितीचे व्यवहार सुरू होते. 2017 च्या हंगामात कांद्याच्या बाजारभावात थोडी वाढ होताच शासनाच्या वतीने बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे धनादेशाद्वारे देण्याचा नवीन नियम सुरू केल्यामुळे सर्वत्र धनादेशाद्वारे व्यवहार होऊ लागले. परिणामी, या नियमामुळे वेळेवर धनादेश न देणे, दिलेले धनादेश बाउन्स होणे यामुळे शेतकर्‍यांची फसगत होऊन शेतकरीवर्ग अडचणीत येत होता. 2017 ते सध्या 2019 दोन वर्षांचा कालावधी जाऊन अद्याप कित्येक शेतकर्‍यांचे 2017 मध्ये विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळालेले नसल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजही पाहावयास मिळत आहेत. कित्येक शेतकरी आजही पैसे काढण्यासाठी व्यापारी व बाजार समित्यांमध्ये चकरा मारत आहेत. 

सध्या आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पेमेंट केले जात असल्यामुळे शेतकरी, व्यापारी, बँक कर्मचारी सगळ्यांसाठी त्रासदायक होत असल्याचे दिसून येत आहे.