Fri, Sep 18, 2020 12:22होमपेज › Nashik › दहा दिवस विलंबाने हरणबारी धरण ओव्हरफ्लो

दहा दिवस विलंबाने हरणबारी धरण ओव्हरफ्लो

Last Updated: Aug 12 2020 8:34PM

हरणबारी धरणमालेगाव : पुढारी वृत्तसेवा

अखेर बुधवारी (दि.१२) हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. सायंकाळच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरुन लाटांचे पाणी मोसम नदीत पडण्यास प्रारंभ झाला. रिमझिम पाऊस होत असला तरी मध्यरात्रीपर्यंत नदी प्रवाही होईल, असे स्थानिकांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत धरण भरण्यास यंदा १० दिवस विलंब झाला. बागलाण व मालेगाव तालुक्यावर वरुणराजा प्रसन्न मात्र, धरणक्षेत्रातील पर्जन्यमान घटल्याचा हा परिणाम आहे. पूर्वापार अनुभवानुसार हरणबारी धरण यावेळी सर्वप्रथम भरले असले तरी चणकापूर, पूनद, केळझर  प्रकल्प क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या धरणांतून पाणी ओसंडल्यानंतर खळाळणार्‍या गिरणा व मोसम, आरम नदीमुळे भरणार्‍या गिरणा धरणात गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी कमी साठा झाला आहे.

बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील डोंगर दर्‍यातील पर्जन्यमानावर नेहमीच हरणबारी धरण भरत आले आहे. त्याप्रमाणे बुधवारी धरणातील पाण्याने सांडवाला स्पर्श केला. गतवर्षी ३ ऑगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते. ११६६ दलघफू धरणाची जलसाठवण क्षमता आहे. धरणाला गेट नाहीत. त्यामुळे धरण भरल्यानंतर सांडव्यावरुन पाणी मोसम नदीत प्रवाही होण्यास प्रारंभ होतो. पूरपाण्याने बागलाण व मालेगाव तालुक्यातील १५ हून अधिक बंधारे भरत भरत पाणी गिरणा नदीला मिळून गिरणा डॅममध्ये पोहोचते. या पूरपाण्याने नदीकाठच्या गावांच्या पाणीयोजना कार्यान्वित होत असतात. यंदा या भागात पर्जन्यमान चांगले असल्याने पाणीस्थिती चांगली आहे. परिणामी, पूरपाणी वाहण्यास विलंब झाला असला तरी त्याविषयी विशेष अशी चिंता व्यक्त झाली नाही. मात्र, भूजल पातळी सुधारण्यासाठी किमान तीन -चार पूर आवश्यक असतात. त्याकडे मोसम खोर्‍याचे लक्ष लागले आहे. सद्या पावसाने काहीसी ओढ दिली असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

नाशिकः पंक्चर काढताना चुलत भावांना चिरडले 

मालेगाव तालुक्यात सरासरी ४५७.३१ मिमी पर्जन्यापेक्षा १२३.२५ टक्के (५६४ मिमी) अधिक पाऊस आतापर्यंतच झाला आहे. याचप्रमाणे बागलाणमध्ये सरासरी ४८८.२० मिमी पर्जन्यापेक्षा १२०.२४ टक्के (५८७ मिमी) पाऊस झाला आहे. यातुलनेत कळवण तालुक्यावर वरुण देवता रुसल्याचे चित्र आहे. केवळ ५०.९७ टक्केच पाऊस झालाय. या तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६३९.६१ मिमी असून, आजघडीला केवळ ३२५ मिमीच पाऊसपाणी बरसले आहे.

‘गिरणा’५० तर, चणकापूर केवळ ३२ टक्के

गतवर्षी जुलैच्या अखेरच्या टप्प्यातच चणकापूरसह पूनंद, हरणबारी, केळझर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होऊन सर्वच लहान -मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. ‘मोसम’ला काही दशकांनंतर आलेल्या महापूरात शहरातील रामसेतू पुलाचे कठडे तुटले होते. यंदा मात्र धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. बुधवारी सकाळीपर्यंत गिरणा धरणात ५० टक्के (९२३३ दलघफू), चणकापूरमध्ये ३२ टक्के  (७६९ दलघफू), पूनदमध्ये ४७ टक्के (६१३ दलघफू) एवढाच साठा होता. गतवर्षी ‘हरणबारी‘प्रमाणेच ५७२ दलघफू क्षमतेचे केळझर धरणही ओव्हरफ्लो झाले होते. आजघडीला त्यात केवळ ३८ टक्के (२१९ दलघफू) एवढाच जलसंचय झाला आहे.

 "