Fri, May 29, 2020 09:11होमपेज › Nashik › गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jul 10 2019 1:42AM | Last Updated: Jul 09 2019 10:52PM
नाशिक : प्रतिनिधी

जलकुंभ फुटून चार मजुरांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे गुप्ता यांच्यावर अद्यापही अटकेची टांगती तलवार आहे. मात्र, पोलिसांना ते सापडत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  

सातपूर येथील ध्रुवनगर परिसरातील मंगळवारी (दि.2) अपना घर गृहप्रकल्पात जलकुंभ फुटून चार मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गृहप्रकल्पाचे बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांच्यासह चार ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्परता दाखवत गुप्ता यांच्या व्यतिरिक्त इतर चौघांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत चौकशीही केली. मात्र, गुप्ता यांनी पोलिसांना गुंगारा दिला. एकीकडे पोलिसांचे पथक गुप्ता यांच्या मागावर असताना त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सोमवारी (दि.8) या अर्जावर पोलीस आणि बचाव पक्षाने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या अर्जावर मंगळवारी (दि.9) निकाल ठेवला होता. त्यानुसार न्यायालयाने गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यामुळे गुप्ता यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र, पोलिसांना गुप्ता यांचा शोधच लागत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

शहर पोलीस परराज्यात जाऊन सराईत गुन्हेगारांना पकडत असताना बांधकाम व्यावसायिक गुप्ता सापडत नसल्याने पोलीस अप्रत्यक्षरित्या गुप्ता यांना पाठीशी घालत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.