Fri, May 29, 2020 08:46होमपेज › Nashik › समजूत घालण्याशिवाय काहीच उरले नाही

समजूत घालण्याशिवाय काहीच उरले नाही

Published On: Sep 17 2019 1:56AM | Last Updated: Sep 17 2019 12:41AM
नाशिक : प्रतिनिधी

शरद पवारांकडे आता स्वतःच्या मनाची समजूत घालण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यामुळे त्यांनी तेवढेच काम करून लवकर निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाही तर आहे तेसुद्धा पक्षात राहणार नाहीत, अशी खोचक टीका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.16) नाशिक येथे केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणार्‍या जाहीर सभेच्या तयारीची माहिती घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकमध्ये मेगा भरती होणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता आमच्याकडे उदयनराजे आले यापेक्षा आणखी मोठे कोण आहे असा प्रतिप्रश्न केला. विरोधकांकडे आता कोणी मोठे उरलेले नाही. पक्षांतर करणार्‍यांनी पवारांना अंतःकरणात ठेवावे पण आमच्याकडे यावे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगत पवार आता स्वत:च्या मनाची समजूत करून घेत आहेत. यावरच त्यांनी समाधानी राहावे, असा सल्ला पालकमंत्री महाजन यांनी दिला. परंतु, पक्ष प्रवेश केलेल्या व्यक्तीची त्या ठिकाणी ताकद असेल तर अशा 15 ते 20 जागांवर बदल होऊ शकतो. आणि ते अपेक्षितही आहे.

पक्षाने दोन ते तीन वेळा सर्व मतदारसंघांतील सर्वेक्षण केले असल्याचे त्यांनी सांगितले. दि. 18 रोजी दुपारी 3 वाजता बाइक रॅली निघेल. 4 वाजता त्र्यंबक नाका येथून रोड शो सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, लक्ष्मण सावजी, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, वसंत गिते, सुनील बागूल, विजय साने, नाना शिलेदार, आशिष नहार, उत्तम उगले, शिवाजी गांगुर्डे, सुरेश पाटील उपस्थित होते.

20 एकर जागेवर होणार जाहीर सभा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनातील 20 एकर जागेवर जाहीर सभा होणार आहे. सभेला अडीच ते तीन लाख जनसमुदाय उपस्थित राहील. सव्वा लाख इतकी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 50 एलईडी स्क्रिन उभारले जाणार असून, 12 वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.   

युतीबाबत अद्याप चर्चा नाही

युतीविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी चर्चा करतील आणि त्यानंतर जागा निश्चित होतील. युती असली तरी दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र कार्यक्रम असून, पक्ष संघटनेचा तो एक भाग असतो. युतीत कोणताही वाद नाही आणि असले तरी त्यावर तोडगा निघू शकतो.