Fri, Jun 05, 2020 14:25होमपेज › Nashik › नंदूरबार; गटबाजी, बंडोबामुळे चुरस

नंदूरबार; गटबाजी, बंडोबामुळे चुरस

Published On: Apr 27 2019 2:00AM | Last Updated: Apr 26 2019 7:53PM
योगेंद्र जोशी

नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील लढत गटबाजी आणि बंडखोरीमुळे चांगलीच रंगतदार बनली आहे. आदिवासीबहुल मतदारांना  आपलेसे करण्यासाठी काँग्रेसबरोबरच भाजपनेही कंबर कसली आहे. 

प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असला तरी भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीमुळे उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या पुढे आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे कोणताही गाजावाजा न करता गनिमी कावा पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांचा प्रचार सुरू आहे. 18 लाख मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीच्या डॉ. हीना गावित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे अ‍ॅड. के. सी. पाडवी आणि भाजपमधील बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्यातच होत आहे.  जलसंपदामंत्री गिरीश महाजन डॅमेज कंट्रोल किती आणि कसे करणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. धडगाव-अक्‍कलकुवा विधानसभा मतदारसंघातून के. सी. पाडवी सलग सहा वेळा निवडून आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा लोकसभेला नशीब अजमावले. मात्र दोन्ही वेळेस त्यांना विजयाने हुलकावणी दिली. आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना कोणत्याही मोठ्या सभा नाहीत, कोणत्याही मोठ्या नेत्याचा प्रचार कार्यात सहभाग नाही, कोणतीही मोठी प्रसिद्धी नाही, हेच अ‍ॅड. पाडवी यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत आहे. प्रारंभी प्रियांका गांधी यांची सभा घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. राहुल गांधी यांची सभा नंदूरबारऐवजी धुळ्यात पार पडली; तर काँग्रेस अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी शस्त्रक्रियेमुळे प्रचारापासून दूरच होते. 

माजी खासदार माणिकराव गावित आणि त्यांचे पुत्र भरत गावित यांचे प्रारंभीचे बंड नंतरच्या काळात थंडावले आहे. मात्र, या घटनांनी अ‍ॅड. पाडवी यांची डोकेदुखी वाढली होती. शिरपूरचे आमदार अमरिशभाई पटेल, सुरुपसिंग नाईक यांनी प्रचार यंत्रणा राबवून काँग्रेसची युवा फळी कार्यरत ठेवली असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉ. सुशील अंतुर्लीकर यांची उमेदवारी काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारी ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतविभागणी, बंडखोरी याचा फटका नेमका कुणाला बसतो, हे निवडणुकीनंतरच समजू शकेल.