Wed, Jun 03, 2020 07:36होमपेज › Nashik › ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा गळा चिरून खून

ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा गळा चिरून खून

Published On: Dec 17 2018 1:37AM | Last Updated: Dec 17 2018 12:08AM
जानोरी : वार्ताहर

येथील ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचा धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.15) रात्री 10 वाजता घडली. कुणाल विष्णू सरनाईक असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी दोन ओळखीतील युवक कुणालच्या घरी आले. त्यांनी त्याला ओझर येथे यात्रेस जायचे आहे, असे घरच्यांना सांगून सोबत घेऊन गेले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता शिवनई-म्हसरूळ रोडवर आंबेहिल डिफेन्स गेटजवळ अज्ञात व्यक्‍तीचा मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती शिवनई येथील पोलीसपाटील पांडुरंग गडकरी यांनी दिडोरी पोलिसांना दिली. 

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सदर युवक जानोरी येथील असल्याची   माहिती मिळाली. मयत युवकाच्या मानेवर धारदार शस्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे यावेळी तपासात निष्पन्‍न झाले. 

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर युवक जानोरी ग्रामपंचायत सदस्या संगीता सरनाईक यांचा मुलगा आहे. पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक उमेश बोरसे, हवालदार अरुण आव्हाड, दिलीप पगार तपास करीत आहेत.