Wed, Jun 03, 2020 21:07होमपेज › Nashik › गोदेला पूर; धरणे ओव्हरफ्लो

गोदेला पूर; धरणे ओव्हरफ्लो

Published On: Jul 31 2019 1:15AM | Last Updated: Jul 31 2019 1:15AM
नाशिक : प्रतिनिधी

चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची मंगळवारी (दि.30) जिल्ह्यात रिपरिप कायम होती. त्यामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला. मात्र, नांदगाव व चांदवड तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मंगळवारी इगतपुरी, सिन्‍नर, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा तालुक्यात पावसाची रिपरिप कायम होती. इगतपुरीतील सर्वच जलाशये तुडुंब भरून वाहत होती. दिंडोरी तालुक्यातील धरणेही ओव्हरफ्लो झाल्यामुळे छोट्या- मोठ्या नद्यांना पाणी सोडण्यात आले आहे. मालेगावच्या गिरणा नदीलाही पूर आला आहे. निफाड तालुक्यातही पावसाने मुक्‍काम ठोकल्याचे दिसून आले. कळवण तालुक्यातील चणकापूर आणि पुनद ही धरणे 50 टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. मंगळवारी जिल्हाभरात संततधार सुरूच असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. चार दिवसांपासून दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने मंगळवारी (दि.30) काहीशी उसंत घेतली मात्र, दिवसभर अधून- मधून बरसणार्‍या सरी नागरिकांना भिजवत होत्या. त्यामुळे अचानक येणार्‍या पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडत होती. दरम्यान, गंगापूर धरणाचा पाणीसाठा 85 टक्के झाला असून, 8, 833 क्यूसेक इतक्या वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले आहे. 

सकाळी 6 ते दुपारी 1 या कालावधीत गंगापूर धरणातून 7,833 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच असल्याने त्यात एक हजार एक हजार क्यूसेकने वाढ करण्यात आली आहे. यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणात 4,773 दलघफू (84.78 टक्के) इतका साठा झाला असून, काश्यपी धरणात 1075 तर गौतमी गोदावरी धरणात 1,391 इतका जलसाठा झाला आहे. मंगळवारी गंगापूर धरण परिसरात 84 मिमी पाऊस पडला. काश्यपी धरण क्षेत्रात 42, गौतमी 40, त्र्यंबकला 37 तर अंबोली क्षेत्रात 79 मिमी पाऊस पडला. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून 50 हजार 65 क्यूसेक इतके पाणी सोडले जात आहे. यामुळे जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावत असून, यामुळे मराठवाडा, विदर्भवासीयांनी समाधान व्यक्‍त केले आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिली तर पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. 

धरणातून विसर्ग

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गोदावरीला दुसर्‍यांदा मोठा पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि संबंधित सर्वच विभाग एकमेकांशी संपर्क साधून असल्याने गंगापूर धरणातून किती पाणी व कधी सोडण्यात येणार आहे याविषयी माहिती दिली जात आहे. यामुळे संभाव्य धोके टळले जात आहेत.