Tue, Jun 02, 2020 13:02होमपेज › Nashik › संततधार सुरूच; गोदेचा पूर कायम

संततधार सुरूच; गोदेचा पूर कायम

Published On: Aug 06 2019 1:48AM | Last Updated: Aug 06 2019 1:48AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी (दि. 5) संततधार सुरूच होती. धरणांमधील आवक काही प्रमाणात घटल्याने विसर्गात घट करण्यात आली. गोदावरीची पूरपरिस्थिती कायम असली तरी शहरातील विविध भागांमध्ये शिरलेले पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. नाशिक-मुंबई रेल्वेसेवा अद्यापही धीम्यागतीने सुरू असून, बससेवा मात्र ठप्प आहे. जिल्ह्यात दिवसभरात 679.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

चार दिवसांपासून जिल्ह्याला झोडपून काढणार्‍या पावसाचा जोर सोमवारी काहीसा कमी झाला. नाशिक शहर व परिसरात दिवसभर हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. गंगापूर धरण व परिसरातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील विसर्ग 18,909 क्यूसेकपर्यंत घट करण्यात आली. परिणामी गोदावरीच्या पूरपातळीत काहीशी घट झाली असली तरी रामसेतू पूल मात्र अद्यापही पाण्याखालीच आहे. दरम्यान, गोदाकाठावरील घुसलेले पाणी ओसरल्याने सराफ बाजार, दहिपूल, नेहरू चौकासह शहरातील निरनिराळ्या भागांत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. परिणामी शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 

त्र्यंबकेश्‍वरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अद्यापही पाण्याखाली गेले आहेत. शहरातील पूरपरिस्थिती बघता श्रावणातील पहिला सोमवार असूनदेखील भाविकांनी त्र्यंबकेश्‍वराकडे पाठ फिरवली. सुरगाणा, दिंडोरी, कळवण, पेठ आदी तालुक्यांमध्ये दिवसभर संततधार सुरू होती, तर इगतपुरीत पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मध्य रेल्वेचे नाशिक-मुंबई वेळापत्रक अद्यापही बिघडले असले तरी रेल्वेगाड्या मुंबईला पोहचत असल्याने प्रवाशांंना दिलासा मिळाला. 

नाशिक व इगतपुरी तालुक्यातील नद्यांमधून येणार्‍या पाण्याची आवक काहीशी मंदावल्याने नांदूरमध्यमेश्‍वरच्या विसर्गात 1,36,133 क्यूसेकपर्यंत घट करण्यात आली. चणकापूर, पालखेडमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात 679.1 मिमी पाऊस झाला. सुरगाण्यात सर्वाधिक 191 मिमी पाऊस झाला. नाशिकमध्ये 22.2, इगतपुरीत 35, त्र्यंबकेश्‍वरमध्ये 64, दिंडोरीत 31, पेठ 73, निफाड 4.5, सिन्नर 18, चांदवड 35, देवळ्यात 38, येवल्यात 9.4.

जिल्ह्यात तिघे पुरात वाहून गेले

जिल्ह्यातील संततधारेमुळे सर्व नद्यांना पूर आला असून, दोन दिवसांत तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्या तिघांचाही अद्याप शोध लागलेला नसून अग्निशमन दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, दुगाव येथे पडीक घराची भिंत कोसळून सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 

शहरात पावसामुळे रविवारी (दि.4) महापूर आला होता. त्यावेळी भारतनगर जवळील शिवाजी वाडी येथील घरकुल योजनेतील रहिवासी संजय एकनाथ वल्लाड (40) हे नासर्डी नदीत वाहून गेले आहेत. त्यांचा अद्याप शोध न लागल्याने ते बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत सोमवारी (दि.5) परशराम काशीनाथ अनवट (40, रा. कालवीगाव) हे सोमवारी (दि.5) सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी जात होते. त्यावेळी तोल गेल्याने ते नदीत पडून पाण्याच्या प्रवाहात दिसेनासे झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर तिसर्‍या घटनेत संत गाडगे महाराज पुलावरून सोमवारी दुपारच्या सुमारास चौघांनी पोहण्यासाठी नदीपात्रात उड्या मारल्या. त्यात आकाश एस. लोंढे (19, रा. फुलेनगर) याच्यासह राहुल गवारे, प्रवीण चौधरी, रोहित उफाडे यांचा समावेश होता. एकापाठोपाठ एक चौघांनी नदीपात्रात उडी मारल्यानंतर त्यातील आकाश लोंढे पाण्यात दिसेनासा झाला. इतर तिघांनी नदीचा किनारा गाठून बाहेर आले. मात्र, आकाश हा तपोवनाच्या दिशेने पुराच्या पाण्यात वाहून जाताना नागरिकांना दिसला.