Fri, Jun 05, 2020 06:23होमपेज › Nashik › कांदा प्रक्रिया उद्योगासाठी विशेष अर्थसहाय्य द्या : छगन भुजबळ

कांदा प्रक्रिया उद्योगासाठी विशेष अर्थसहाय्य द्या : छगन भुजबळ

Published On: Jan 29 2019 1:35AM | Last Updated: Jan 28 2019 10:54PM
लासलगाव : वार्ताहर

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व येवला येथील कृषी उत्पन्‍न बाजार समित्यांमार्फत कांद्यांवर प्रक्रिया करून उप उत्पादने तयार करणारे प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली आहे.

भुजबळ यांनी म्हटले आहे की, देशातील कांदा पिकाच्या 60 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तर राज्यातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. माझ्या मतदारसंघात कांदा हे प्रमुख पीक असून, येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजार समिती कांद्याबाबत आशिया खंडातील नंबर एकची बाजार समिती आहे. कांदा पीक हे शेतकर्‍याचे जिव्हाळ्याचे पीक असल्याने कांद्याच्या भावाचे नेहमी राजकारण होत असते. जेव्हा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यायला लागते, तेव्हा भाव गडगडतात अशावेळी शेतकर्‍यांना कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते व शेतकरी देशोधडीला लागला जातो. त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, कांद्याला मिळणार्‍या भावामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला असून, सरकारने याबाबत गांभीर्याने पावले उचलावीत असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.