Fri, Jun 05, 2020 05:10



होमपेज › Nashik › नाशिकमधून दोन दिवसांआड एक मुलगी बेपत्ता

नाशिकमधून दोन दिवसांआड एक मुलगी बेपत्ता

Published On: Apr 27 2018 11:21PM | Last Updated: Apr 27 2018 11:20PM



नाशिक : प्रतिनिधी

एप्रिल महिन्यात 25 तारखेपर्यंत तब्बल 30 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे. त्यापैकी बहुतांश मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तरी गत तीन वर्षांत तब्बल 405 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद  आहे. त्यामुळे दरवर्षी सरासरी दोन दिवसाआड एका मुलीचे अपहरण होत असल्याचे वास्तव आहे. सुट्टीच्या दिवशीही घरकाम सांगत असल्याचा राग आल्याने दोन मुलींनी घर सोडून पळ काढल्याची घटना शहरात तीनच दिवसांपूर्वी घडली. पोलिसांनी तातडीने तपास करून या मुलींचा शोध घेत समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.

या घटनेने मुलींची मानसिकता समोर आली असली तरी त्यांच्यासारख्या अनेक मुली प्रेमाच्या आमिषाला बळी पडून, संतापाच्या भरात, मुंबईचे आकर्षण असल्यापोटी पालकांना न सांगताच घर सोडून जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 2015 मध्ये 106 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद होती, तसेच 2016 साली 136 आणि 2017 मध्ये 163 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये आहे. यामुळे दरवर्षी दोन दिवसाआड एका मुलीचे अपहरण होत असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या वर्षी एकट्या एप्रिल महिन्यात 30 मुलींचे अपहरण झाले होते. मात्र, त्यापैकी बहुतांश मुलींचा शोध घेण्यात आला आहे.