Fri, Jun 05, 2020 06:23होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनाच फटकारले

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनाच फटकारले

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:06AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शहर भाजपातील अंतर्गत गटबाजीवर आमदारांचे कान टोचणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही फटकारल्याचे वृत्त आहे. निधी वाटपात दुजाभाव न करता सर्वच आमदारांच्या गटात समान निधी वाटप झाला पाहिजे, अशा कानपिचक्याही महाजन यांना देण्यात आल्याचे बोलले जाते.

शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या एककल्ली कारभाराविरोधात दोन आमदार आणि खासदाराने मंगळवारी मुख्यमंत्र्यांची घेतली होती. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक माणिक कोकाटे, तसेच पक्षाचा एक पदाधिकारीही उपस्थित होता. यावेळी सानप यांच्याबाबतीत तक्रारीचा पाढा वाचताना निधी वाटपात अन्याय केला जात असल्याचेही नमूद केले.

आमदार सानप यांच्या मतदारसंघात मोठ्याप्रमाणात निधी वाटप होत असताना अन्य दोन आमदारांच्या मतदारसंघात अपूरा निधी दिला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावरून मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना फटकाल्याचे सांगण्यात आले. एका मतदारसंघात जास्त निधी गेला तर अन्य दोन मतदारसंघातील मतदारांची पक्षाविषयी काय मानसिकता राहिल, असा जाब महाजन यांना विचारल्याचेही सांगण्यात आले. तीनही आमदारांच्या मतदारासंघात समान निधी वाटप झाला पाहिजे. पक्षाविरोधात वातावरण दुषित व्हायला नको, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले. त्यामुळे महाजन यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेऊन पक्षावर पकड निर्माण करू पाहणार्‍या शहराध्यक्षांनाच धक्का मानला जात आहे.

काही नगरसेवकांकडून होल्डिंगवर छायाचित्र टाकले नसल्याचीही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. पक्षांगर्ततच काही विरोधकांना पुढे करून मात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुद्याचाही समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला. आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे, यापुढे काळजी घेण्याची सूचनाही करण्यात आली. सिडको-सातपूर मतदारसंघाशी निगडीत हा विषय होता.