Mon, Nov 18, 2019 21:29होमपेज › Nashik › गटारी अमावास्येची उद्या धूम

गटारी अमावास्येची उद्या धूम

Published On: Jul 30 2019 1:37AM | Last Updated: Jul 29 2019 11:03PM
नाशिक : प्रतिनिधी

हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना गुरुवारपासून (दि. 1 ऑगस्ट) सुरू होणार असल्याने बुधवारी (दि. 31 जुलै) अनेकांकडून ‘गटारी’ साजरी होणार आहे. श्रावण हा धार्मिक महिना असल्याने या काळात बहुतांश जण महिनाभर व मद्यपान वर्ज्य करतात. महिनाभराची ही ‘कसर’ बुधवारीच भरून काढली जाणार असल्याने अनेकांनी जोरदार पार्ट्यांचे नियोजन केले आहे. 

हिंदू धर्मात श्रावण हा अत्यंत पवित्र व व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार अन्य दिवशी उपवास केला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे महत्त्वाचे सण याच महिन्यात येतात. त्यामुळे बहुतांश लोक या महिन्यात मांसभक्षण व मद्यपान वर्ज्य करतात. अत्यंत प्रिय असलेल्या या गोष्टींचा महिनाभराचा वियोग काहीसा सुसह्य करण्यासाठी अनेक जण आषाढाच्या अमावास्येला भरपूर मांसभक्षण, मद्यपान करतात. त्यामुळे या अमावास्येला ‘गटारी’ असे संबोधन गेल्या काही वर्षांपासून प्राप्त झाले आहे. यंदा बुधवारी (दि. 31) आषाढ अमावास्या असून, या दिवशी तळीरामांकडून जंगी गटारी होणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. मित्रमंडळींकडून ‘बैठकी’ची ठिकाणे ठरवली जात आहेत. अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवरही यासंदर्भातील चर्चा सुरू होत्या. त्यातच सध्या दमदार पाऊस पडत असल्याने तळीरामांच्या आनंदात भरच पडली आहे. दरम्यान, बरेच जण सोमवार, गुरुवार व शनिवार या दिवशी मांसभक्षण व मद्यसेवन करीत नाहीत. त्या दृष्टीनेही यंदा गटारी अमावास्या बुधवारी आल्याने दुधात साखरच पडली आहे. बुधवारी सायंकाळनंतर शहरातील बर्‍याच बारमध्ये तळीरामांची गर्दी होण्याची चिन्हे आहेत.