Tue, May 26, 2020 12:17होमपेज › Nashik › नाशिक : चौदा महिन्यांच्या बालिकेचा गळा चिरून खून

चौदा महिन्यांच्या बालिकेचा गळा चिरून खून

Published On: Jul 17 2019 2:07AM | Last Updated: Jul 17 2019 2:07AM
पंचवटी : वार्ताहर 

अवघ्या चौदा महिन्यांच्या बालिकेचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 16) घडल्याने परिसर हादरून गेला. घरात शिरलेल्या चोरट्याने ही हत्या केल्याचा बालिकेच्या आईचा दावा असून, प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

स्वरा मुकेश पवार असे मयत बालिकेचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या मुकेश पवार यांची ती कन्या होती. औरंगाबाद रोडवरील साई पॅराडाइज या इमारतीत दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात मयत बालिकेची माता योगिता पवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,  त्या दुपारी 2 वाजता कचरा टाकण्यासाठी फ्लॅटबाहेर गेल्या होत्या. तेथून परतत असताना अज्ञात चोरटा हातात चाकू घेऊन त्यांच्या पाठीमागे आला. त्याने योगिता यांना घरात लोटून दरवाजा बंद केला व बेडरूममध्ये झोपलेल्या 14 महिन्यांच्या स्वराचा गळा कापला. योगिता यांनी प्रतिकार केला असता, चोरट्याने त्यांनाही मारले. या झटापटीत त्या अर्धा तास बेशुद्ध पडून होत्या. शुद्धीवर येताच त्यांनी शेजार्‍यांच्या मदतीने स्वराला उपचारांसाठी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. 

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मात्र, घरात झटापट झाल्याची चिन्हे पोलिसांना आढळून आली नाहीत. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिनेही सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा सगळा बनाव असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, सर्व बाजूंनी कसून तपास सुरू आहे. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, वरिष्ठ निरीक्षक युनिट एकचे आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, गुन्हे शोध पथकाचे संदीप शेळके आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, 3 वाजता कळवूनही आडगाव पोलीस पंचवटी पोलीस पोहोचल्यानंतर तब्बल दीड तास उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

घटनास्थळी झटापट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले नाही. घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही.  त्यामुळे चोरीचा दावा संशयास्पद वाटत आहे. लवकरच तपास करून प्रकरणाची उकल करू, असे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

अनेक प्रश्‍न अनुत्तरित

मयत बालिकेची माता योगिता पवार यांनी पोलिसांसमोर केलेले अनेक दावे फोल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवार या आपण ब्लेडने नखे कापत असताना, चोरट्याने आपल्या हातातून ब्लेड घेऊन त्याद्वारे बालिकेचा गळा कापल्याचे म्हणत आहेत. मात्र, चोरट्याने त्याच्याकडे चाकू असताना योगिता यांच्याकडील ब्लेड का घेतले, घरात नेलकटर असताना योगिता ब्लेडने नखे का कापत होत्या, चोरट्याने फक्त हातावर मारल्यानेही त्या बेशुद्ध का पडल्या, आजूबाजूच्या नागरिकांना या झटापटीचा आवाज का आला नाही, त्यांना कोणीही पळून जाताना का दिसले नाही, घरातील एकही वस्तू चोरीला का गेली नाही, असे अनेक प्रश्‍न पोलिसांनी उपस्थित केले आहेत.