Sun, Jun 07, 2020 11:35होमपेज › Nashik › जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण ठार

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण ठार

Last Updated: Oct 10 2019 11:13PM
सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात घोरवडहून सिन्नरकडे येणार्‍या स्विफ्ट कारला मागून भरधाव येणार्‍या पिकअप जीपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी (दि.9) सायंकाळी 7.15 च्या सुमारास हा अपघात घडला.

दगू गेणू हगवणे (61) असे मृत व्यक्तीचे नाव असून, चालक रवी गंगाधर हगवणे (43), ज्ञानेश्वर सहादू गिते (45, रा. घोरवड, ता. सिन्नर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

हे तिघे रवी हगवणे यांच्या स्विफ्ट कार (क्र. एम एच 43, एक्स 7785)ने सिन्नरकडे येत असताना मागून भरधाव येणार्‍या पिकअपने घोरवड घाटातील मोरया हॉटेलजवळच्या वळणावर जोरदार धडक दिली. त्यात दगू हगवणे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सरपंच रमेश हगवणे, शरद हगवणे, विनय हगवणे, गौरव गिते, देवीदास लहामटे, बाळू म्हसाळ आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या जखमी दगू हगवणे यांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. रुग्णवाहिकेतून जखमींना तत्काळ सिन्नरच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तथापि, प्रकृती चिंताजनक असल्याने नाशिक येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. उपचारापूर्वीच दगू हगवणे यांची प्राणज्योत मालवली होती. गुरुवारी (दि.10) जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर घोरवड येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हगवणे घोरवड विकास सोसायटीचे माजी चेअरमन होते. वारकरी संप्रदायात रमलेला माणूस म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. एकादशीच्या दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

कर्‍हे घाटात अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावरील कर्‍हे घाटात कार आणि मालट्रकच्या भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 10) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गणेश सुकदेव दराडे (29, रा. कर्‍हे, ता. संगमनेर), श्रीकांत बबन आव्हाड (28, रा. दरेवाडी, हल्ली मु. सरदवाडी रोड, सिन्नर) व अजय श्रीधर पेंदाम (27, रा. नागबीड, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत संगमेनर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गणेश सुकदेव दराडे, श्रीकांत बबन आव्हाड व अजय श्रीधर पेंदाम हे तिघे तरुण वॉक्सवेगन (क्र. एमएच. 19, बीजे 8111) या कारमधून सिन्नरहून कर्‍हे घाटाच्या दिशेने येत होते. यावेळी वाहन चालविणार्‍या दराडे याला पुढे चाललेल्या मालट्रकचा (क्र. एमएच 12, केपी 1799) अंदाज न आल्याने कारची मालट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. या अपघातात कारमधील तिघेही वाहनातच दाबले गेल्याने त्यांचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. तिघाही जखमी तरुणांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. श्रीकांत आव्हाड हा परिवारासह सिन्नर येथील सरदवाडी रोडलगतच्या उपनगरातील रहिवासी होता.