Tue, Jun 02, 2020 13:42होमपेज › Nashik › गॅस गळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

गॅस गळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

Published On: Feb 21 2019 1:30AM | Last Updated: Feb 21 2019 12:46AM
नाशिक : प्रतिनिधी

घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील चाचडगावजवळील धाऊर येथे ही हृदयद्रावक घटना घडली. 

धाऊर येेथे मुरलीधर हरी चौधरी या शेतकर्‍याचे कुटुंब मंगळवारी रात्री झोपलेले होते. रात्री 10.30 च्या सुमारास घरगुती गॅसच्या सिलिंडरमधून गळती सुरू झाली. ही बाब चौधरी कुटुंबीयांच्या लक्षात आली नाही. अवघ्या काही वेळात घराला मोठी आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने मुरलीधर हरी चौधरी (32), त्यांच्या पत्नी कविता मुरलीधर चौधरी (30), मुलगा तुषार मुरलीधर चौधरी (10) व पुतण्या नमन कैलास चौधरी (8) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीत सर्व संसारोपयोगी वस्तूंसह दुचाकीही भस्मसात झाली. बुधवारी (दि.20) सकाळी कळवण  विभागीय पोलीस अधिकारी देवीदास वाघमारे, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यासह प्रांताधिकारी उदयकुमार किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पंचनामा करण्यात आला.