Wed, Jan 27, 2021 08:43होमपेज › Nashik › सेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीत

सेनेचे माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीत

Published On: Jan 18 2019 1:39AM | Last Updated: Jan 18 2019 12:49AM
नाशिक : प्रतिनिधी 

दिंडोरी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिंडोरी मतदारसंघात हरिश्‍चंंद्र चव्हाण खासदार आहेत. सेना-भाजपा युतीचे संकेत असून, हा मतदारसंघ भाजपाला जाण्याच्या शक्यतेने त्यांनी  राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सेनेला भगदाड पडण्याची शक्यता आहे.

डॉ. पवार यांचे गणित बिघडले

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने दिंडोरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून, गेल्या वेळी मोदी लाटेतही प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात दोन हात करण्याची तयारी दाखविणार्‍या डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पवार नाराज असल्याचे बोलले जात असून, त्या ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आकारास येत असलेली समीकरणे बघून इच्छुकांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.  शिवसेनेचे माजी आमदार तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले यांनी ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाले हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. पण, पुढील गणित सेना-भाजपा युतीवर अवलंबून आहे. युती झाल्यास जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाऊ शकतो. कारण, हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपाचा विद्यमान खासदार या मतदारसंघात आहे. काही दिवसांपूर्वी युतीबाबत संभ्रमावस्था होती. आता मात्र युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहे. नेमके हेच ओळखून महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाने डॉ. पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाले यांनी प्रवेश करताना लोकसभा उमेदवारीचा शब्द राष्ट्रवादीकडून सोडवून घेतला असण्याची दाट शक्यता  आहे. त्यामुळे डॉ. पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे डॉ. पवार या दिवंगत माजी आमदार ए. टी. पवार यांच्या स्नुषा असून, त्यांनी गेल्या वेळी याच मतदारसंघातून चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मोदी लाटेतही त्यांनी लाखोंच्या संख्येत मते मिळविली होती. याहीवेळी त्या इच्छुक असून, त्यांनी तयारी केली होती. महाले यांच्या प्रवेशाने मात्र त्यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता बळावली असून, त्या नाराज असल्याचे बोलले जाते. तरीही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ आपल्यावर अन्याय करणार नाहीत, अशी त्यांची खात्री आहे. तसे झाल्यास बघू, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

डॉ. पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

डॉ. पवार यांचे पुनर्वसन नेमके कसे होणार, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता ताणली आहे. एक तर त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची म्हटल्यास ती कळवण मतदारसंघातून मिळणे अवघड आहे. कारण या मतदारसंघातून त्यांचे दीर नितीन पवार आधीपासूनच तयारीला लागले आहेत. अर्थातही डॉ. पवार यांनीही पक्ष ‘उमेदवारी कोठून देणार’ असे सूचक वक्तव्य केले आहे. अन्य मतदारसंघ शोधायचा म्हटला तर तेथील इच्छुक थांबणार का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. विधान परिषदेत पाठवायचे झाल्यास अजून बराच कालावधी जायचा आहे. त्यामुळे डॉ. पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तसेही त्यांना पक्षाने अद्याप काही सांगितले नसून नंतर ‘बघू’ असे म्हटले आहे. एकंदरीत, सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेल्या डॉ. पवार ऐनवेळी शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी करू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे.