Wed, Jun 03, 2020 08:36होमपेज › Nashik › नाशिक : चणकापूर, पुनंदमधून होणार्‍या विसर्गामुळे गिरणा नदीला पूर 

नाशिक : चणकापूर, पुनंदमधून होणार्‍या विसर्गामुळे गिरणा नदीला पूर 

Published On: Aug 04 2019 4:00PM | Last Updated: Aug 04 2019 4:00PM

नाशिक : गिरणा नदीमालेगाव : वार्ताहर

चणकापूर व पुनद  धरणातून रविवारी २२ हजार ५२ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.  नद्या व नाले मिळून सुमारे २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात होत असल्याने नदीला पूर आला आहे.  सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण ही ओव्हरफ्लो झाल्याने सुमारे १० हजार क्युसेस पाणी मोसम नदीत सोडण्यात आले आहे. 

चणकापूर व पुनद धरण पाणलोट क्षेत्रात संततधार  पाऊस लागल्याने गिरणा नदीला हंगामातील पहिले पूरपाणी ३० जुलैला वाहिले. त्यानंतरही धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. शनिवारी (दि.३) सकाळी नऊ वाजता चणकापूर धरणातून सात हजार ६३० व पुनद धरणातून एक हजार ४१३ क्सुसेस पाणी सोडण्यात आले होते. त्यातच मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी (दि.४) चणकापुर धरणातून १४ हजार ५७४ क्युसेस तर पुनद धरणातून सात हजार ४७८ क्सुसेस पाणी सोडण्यात आले आहे. ठेंगोडा बंधाराही ओसंडून वाहत आहे. संध्याकाळपर्यंत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. दरम्यान प्रांताधिकारी विजयानंद शर्मा व तहसीलदार सी. आर. राजपूत यांनी शहरातील गिरणापुलासह दाभाडी येथील रोकडोबा हनुमान मंदिराजवळील गिरणा नदी काठाची पाहाणी केली. 

बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण पाणलोट क्षेत्रात ही गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे हरणबारी धरण शनिवारी (दि.३) सकाळी आठ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. यामुळे बागलाणच्या मोसम खोर्‍यासह मालेगाव तालुक्यावर ओढवलेले पाणीसंकट दूर झाले आहे. त्यातच या भागातही मुसळधार पाऊस होत असल्याने या धरणातून १०हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत झाल्यामुळे मोसम नदीस पूरपाणी वाहू लागले आहे. रविवारी (दि.४) दुपारपर्यंत अंबासण गावापर्यंत पुराचे पाणी आले आहे. मालेगाव येथे रात्रीपर्यंत पुरपाणी येण्याचा अंदाज आहे. या दरम्यान नदी पात्रात कोणीही पोहण्यासाठी अथवा सेल्फी काढण्यासाठी जाऊ नये असे आवाहन वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे यांनी केले आहे.