Sat, Jul 11, 2020 19:17होमपेज › Nashik › नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती; महामार्गावरील वाहतूक बंद

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती; महामार्गावरील वाहतूक बंद

Published On: Aug 09 2019 12:36PM | Last Updated: Aug 09 2019 1:02PM

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पूरस्थितीनंदुरबार : प्रतिनिधी

मागील २४ तास सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा जलमय स्थिती झाली आहे. शेकडो घरांची पडझड झाली आहे. नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे संपर्क पुन्हा खंडित झाला आहे. दरम्यान, तळोदा तालुक्यात वाहून गेल्याने एका महिलेचा तर शहादा तालुक्यात भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रशासन गतिमान बनले असून पंचनामे सुरू झाले आहेत.

आज (ता.९) ११ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७५ टक्के म्हणजे ६०० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प भरून वाहत आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे जिल्ह्यातून जाणारे प्रमुख सुरत महामार्ग तसेच  बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग अनेक ठिकाणी खंडित होऊन वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला आहे.

नंदुरबार शहरात गत २४ तास सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात सर्वत्र जलमय स्थिती बनली. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील १२५  हून अधिक घरांची पडझड झाली. एक वासरू आणि दहा मेंढ्या मरण पावल्याची घटना घडली. नाल्याच्या पुरात अनेकांचे संसारपयोगी वस्तू वाहून गेल्या. नंदुरबार शहरात प्रवेश करण्यासाठी एकमेव असलेला धुळे रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतूक भोणे रस्त्याकडून वळवण्यात आली.

परंतु हा रस्ता पूर्ण उद्ध्वस्त झाल्यामुळे मोठा खोळंबा झाला. सततच्या पावसामुळे आंबेबारा धरण भरून वाहत आहे. मौजे वडबारे धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. दरम्यान काल पुन्हा शिवण नदीच्या पुरामुळे वीरचक धरणाचे दारे उघडून ६००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील  या धरणाला लगतच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.

नवापूर येथील रंगावली नदीने देखील रौद्ररूप धारण केले असून धोक्याची पातळी गाठली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरत महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे दरम्यान नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील एका पुलाचा काही भाग खचला असून वाहतुकीला धोकेदायक बनला आहे रंगावली धरणातील सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नवापुर तालुक्यातील कोरडी आणि अन्य प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली. धडगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला यामुळे तालुक्यातील उदय नदीला पूर आला आहे.  तसेच नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.  झाडे कोसळून रस्ते बंद पडले पडले आहेत. चांदसैली मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

शहादा तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून प्रत्येक गावाची जलमय स्थिती बनली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते उखडले गेले होते. परिणामी सर्व संपर्क खंडित झाला होता. आज शुक्रवार रोजी पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. शहादा - शिरपूर रस्ता तूर्त बंद आहे. २४ तासापासून सुरू असलेल्या  सतत  मुसळधारांमुळे शहादा शहर जलमय झाले.  

शहाद्यात सर्वत्र  पाच फुटाहून अधिक पाणी साठले.  शहादा पंचायत समितीच्या कार्यालयात  पाणी घुसले तसेच अन्य शासकीय कार्यालय देखील जलमय झाले. शहरातील सर्व दुकाने बाजारपेठा पाण्याने वेढले गेले. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहादाला जोडणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. शहादा तालुक्यातील मंदाकिनी, गोमाई, तापी या नद्यांनी धोक्याची पातळी गाठायला सुरुवात केली आहे. गोमाई नदीवरील दोन्ही पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. कांताबाई रायसिंग भील (वय ३५ , रा. रायखेड ता. शहादा) ही महिला घराची भिंत पडून मयत झाली.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात  गेल्या बारा तासात  २४  मिमी पावसाची नोंद झाली.  परिणामी हतनुर धरणाचे ४१  दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीच्या पात्रात सुमारे २ लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहादा तालुक्यातील तापी नदीवरील प्रकाश आणि सारंखेडा बँरेजमधील पाणी पातळी प्रचंड वाढली. म्हणून सारंखेडा गॅरेजमधून ६३००क्युमेक्स तर प्रकाशा गॅरेजमधून ६१३० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले. तापी नदीच्या पुरात यामुळे प्रचंड वाढ झाली असून लगतच्या सर्व गावांना इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार-शहादा मार्ग बंद पडला असून प्रकाशा, लांबोळा आणि शहादा यांच्यातला संपर्क पूर्ण खंडित झाला आहे.

तळोदा तालुक्यात देखील पहाड पट्टीत मागील २४ तासापासून मुसळधार पाऊस सतत चालू असल्यामुळे अनेक नाल्यांनी रौद्र रूप धारण केले. खर्डीनदीलाही पूर आला. तळोदा शहर पुन्हा जलमय होऊन बाजारपेठ ठप्प झाली. मौजे मौलीपाडा( सिंगपुर खु) येथील नदीला पुर आल्याने वाहून जाऊन  लिलाबाई विजेसिंग पाडवी वय ५५ वर्षे रा. मौलीपाडा या महिलेचा मृत्यु झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात संततधार पावसामुळे वरखेडी नदीने गुरुवारी दुपारपासूनच रौद्र रूप धारण केले आज शुक्रवार रोजी देखील या नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते परिणामी नेत्रंग शेवाळी या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सोरापाडा येथील नागरिकांना शाळेत व मंदिरात शिफ्ट करण्यात आले. आपत्ती निवारण पथकाला येथे पाचारण करण्यात आले आहे.

शहादा शहर, वैजाली , डामरखेड़ा आवगे, जूनवने आणी अज़ून 5 ते 6 गावात साधारण 150-200 कुटूम्ब सुरक्षित स्थळी हलविले आहेत. नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत 124 घरांची पडझड झाली असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला. मौजे आष्टे येथे 10 कुटुंबाना समाजमंदीरात स्थलांतरीत केले आहे. मौजे खामगावकडे जाणारा पुल अर्धा भाग पडल्यामुळे वाहतूक बंद केली आहे. मौजे गंगापुर येथील तलाव पुर्ण भरल्यामुळे सांडवा खोल करुन पाणी कमी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी नियंत्रण कक्षात बसून परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी मदत कार्याचे नियोजन करण्यासाठी फिल्डवर आहेत.