Sun, Jul 05, 2020 16:18होमपेज › Nashik › मोरांची शिकार करणार्‍या पाच संशयीताना अटक

मोरांची शिकार करणार्‍या पाच संशयिताना अटक

Last Updated: Oct 13 2019 5:38PM
मालेगाव : वार्ताहर

मालेगाव तालुक्यातील कंक्राळे येथील शिवारातील जंगलातून दोन मोरांची शिकार करुन पलायन करणार्‍या पाच शिकारींचा पाठलाग करीत त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने करंजगव्हाण येथे पकडण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले. वाहनासह दोन मृत मोर, एक अग्नीशस्त्र, 22 जिवंत काडतूस व एक चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कंक्राळे शिवारात रविवारी (दि.13) सकाळी साडे नऊच्या दरम्यान वन विभागातील रोजंदारी कर्मचारी समाधान पवार, पोलीस पाटील भगवान सोनवणे व समाधान दासनूर हे जंगल फिरस्ती करीत असताना त्यांना वाहन (एमएच-41- व्ही-8690) संशयीतरित्या उभे असलेले दिसले. कर्मचार्‍यांना संशय आल्याने त्यांनी वाहनाकडे जात तेथे उपस्थित असलेल्या संशयिताकडे चौकशी केली असता ते संशयित वाहनासह करंजगव्हाण गावाच्या दिशेने पळून गेले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी मालेगाव येथील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घटनेची माहिती दिली. 

यावेळी कर्मचार्‍यांनी करंजगव्हाण येथील ग्रामस्थांना फोन करुन संशयित वाहन येत असल्याने ते पकडण्यास सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. वाहनचालकाला रस्त्यावर उभे ग्रामस्थ दिसताच त्यांनी हाताणे या गावाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी हाताणे गावातील ग्रामस्थांना संशयित वाहनाबाबत माहिती देत ते वाहन थांबविण्यासाठी मदत मागितली. त्या ठिकाणी ही ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उभे असल्याचे संशयितांना दिसताच त्यांनी तेथूनच वाहन परत करंजगव्हाण गावाकडे फिरले. 

यावेळी मात्र कर्मचारी व ग्रामस्थांनी त्यांचे वाहन थांबवत संशयित जुबेर खान, नासिर खान, आरिफ मोहमद युनूस, सुफियान अहमद, सलीम अहमद, रिजवान अहमद, अनिस अहमद, मोहमद स्वालेह, मोहमद इसहाक या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर तेथे वाहनाची झडती घेतली असता वाहनात मृत दोन मोर आढळून आले. संशयीताना सोमवारी (दि.14) न्यायालयात उभे केले जाणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी दिली.