Fri, Jun 05, 2020 17:19
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ‘पीआय’ म्हणजे औट घटकेचा पाहुणा!

‘पीआय’ म्हणजे औट घटकेचा पाहुणा!

Published On: Jul 26 2019 1:49AM | Last Updated: Jul 25 2019 10:49PM
पिंपळगाव बसवंत : हेमंत थेटे

पिंपळगाव बसवंत शहरासाठी  एक-दीड वर्षापासून सक्षम व पूर्णवेळ पोलीस अधिकारी मिळत नसल्याची मजेदार स्थिती आहे. साधारणपणे दीड वर्षाच्या काळात तब्बल पाच पोलीस निरीक्षक आले आणि गेले. गंमत म्हणून म्हणायला ही स्थिती मजेेदार असली तरी शहर-परिसरातील रहिवासी हा विषय निघाला, की हसता-हसता अचानक गंभीरही हमखास होतात... 

मार्च 2018 अखेरीस वासुदेव देसले यांची पिंपळगाव पोलीस ठाण्यातून बदली झाली आणि तडकाफडकी बदलीचे हे दुष्टचक्र सुरू झाले. देसलेंच्या जागेवर आनंद निकम म्हणून पोलीस अधिकारी आले, मात्र महिना-दोन  महिन्यांतच त्यांंची विकेट घेण्यात आली. त्यांच्या जागेवर सुरेश मनोरे आले. त्यांनाही दोन-तीन महिन्यांत खो दिला गेला. नंतर चार-सहा महिन्यांपूर्वी संपतराव शिंदे इथे रुजू झाले. ते स्थिरावतच होते आणि त्यांचीही विकेट पडली. आता पंधरा दिवसांपासून महाजन हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे बघून ‘अब ये कितने दिन के मेहमान’, अशी कुजबूज हमखास सुरू होते.  पोलीस खात्याच्या नियमानुसार पोलिस निरीक्षकांना एका पोलीस स्टेशनमध्ये साधारणपणे दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जातो, मात्र पिंपळगाव पोलीस ठाण्यात वर्ष-दीड वर्षातच तब्बल पाच अधिकार्‍यांच्या विकेट पडल्या.

पिंपळगाव पोलीस ठाणे हे मलईदार मानले जाते. हेच कारण तर सतत बदल्यांच्या या ‘बोकेगिरी’मागे नाही ना, असा संशय लोकांना आहे. हे ठाणे जसे मलईदार तसेच जोखिमीचेही आहेच. अवाढव्य बाजारपेठेमुळे येथेे देशभरातून व्यापारी येतात. दररोज काही कोटी रुपयांचे व्यवहार येेथे होतात. शहरातील सर्वच बँकांत दररोज तोबा गर्दी असते. यातून अनेकदा बँक परिसरातून लाखो रुपये लुटीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र एकाही लुटीचा तपास अद्याप लागलेला नाही. भरीसभर पोलीस ठाण्यात स्थैर्य नाही. पोलीस निरीक्षकांच्या सारख्या बदल्या होत असल्याने पोलीस विभाग सुस्तावलेला आहे. आलेले अधिकारी किती दिवस येेथे राहतील याची खात्री नाही. कोणत्या क्षणी विकेट काढली जाईल, हे सांगता येत नाही.