Fri, Jun 05, 2020 18:22होमपेज › Nashik › जळगावात माजी नगरसेवकावर गोळीबार

जळगावात माजी नगरसेवकावर गोळीबार

Published On: Dec 31 2018 1:38PM | Last Updated: Dec 31 2018 1:42PM
जळगाव  : प्रतिनिधी 

महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका उषा पाटील यांचे पती आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष मोतीलाल पाटील यांच्यावर सोमवारी सकाळी गोळीबार करण्यात आल्याची घटना आर्यन पार्क भागात घडली. या घटनेत पाटील यांच्या छातीवर उजव्या बाजूने गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, संतोष पाटील यांचे आर्यन पार्क भागात शेत आहे. तेथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी ते घरून निघाले. ते आर्यन पार्क भागात पोहोचले असता, मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने पाटील यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर गोळी झाडली. संतोष पाटील यांच्या छातीवर उजव्या बाजूला गोळी लागली आहे. संतोष पाटील यांनी जखमी अवस्थेतच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती आपल्या मुलाला मोबाईलवर कळवली. यानंतर पाटील यांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी दुचाकी, पिस्तुलच्या तीन बुलेट्स आढळून आल्या आहेत. यापैकी एक भरलेली, तर दोन रिकाम्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हल्लेखोर पोद्दार शाळेच्या दिशेने पळून गेला. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि अंगात जॅकेट घातले होते. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा गोळीबार जुन्या वादातून झाला असल्‍याची चर्चा आहे.