Sat, Jul 11, 2020 21:16होमपेज › Nashik › कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयास आग

कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयास आग

Published On: Sep 08 2019 1:35AM | Last Updated: Sep 08 2019 1:35AM

कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयास आगनाशिक : प्रतिनिधी

महात्मानगरजवळील समर्थनगर परिसरातील गुलमोहर स्ट्रीट या इमारतीतील कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयास शनिवारी (दि.7) भीषण आग लागली. सुदैवाने इमारतीतील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याने जीवितहानी टळली. मात्र, या आगीत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयास सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच कार्यालयाजवळील एका दुकानातील कर्मचार्‍याने कारडा कन्स्ट्रक्शनमधील कर्मचार्‍यांना सांगितले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्याने चौघांनी कार्यालयाच्या गच्चीवर धाव घेतली. 

आगीची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून पहिले पाण्याचे दोन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. सुरुवातीस अग्निशमन दलाच्या जवानांनी गच्चीवर अडकलेल्या शोएब शेख, समाधान हिवाळे, विशाल ताजणे आणि हरी खंडारे या चौघांना हायड्रोलिक शिडीच्या सहायाने सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशमन दलाने शहरातील इतर पाच उपकेंद्रावरूनही पाण्याचे बंब मागवले. त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प छावणी परिषद, अंबड औद्योगिक वसाहत आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक असे तीन बंब तातडीने घटनास्थळी मागवण्यात आले. एकूण 11 बंबाच्या सहायाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने संपूर्ण मजला वेढल्याने काही बंबांनी पाणी आणण्यासाठी सुमारे 20 फेर्‍या मारल्या. 

दरम्यान, संपूर्ण मजल्याला आगीने वेढल्याने तेथे धुराचे लोळ तयार झाले होते. अखेर हायड्रोलिक शिडीच्या मदतीने खिडक्यांमधून आगीवर पाण्याचा फवारा मारून सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी दोननंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्‍तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर, संगणक, इन्व्हर्टर, बॅटरी, कार्यालयातील स्टेशनरी या आगीत जळून खाक झाली आहे. तसेच आगीचे निश्‍चित कारण अद्याप समजले नसले तरी शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे आ. देवयानी फरांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. पाण्याचे बंब ने-आण करण्यास अडथळे नको यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून समर्थनगरवरील दुतर्फा वाहतूक काही वेळ बंद केली होती. तरीदेखील काही नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना दूर सारत परिसर मोकळा केला होता.

आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. चौकशी केल्यानंतर कारण समजेल. हवेमुळे आगीने रौद्ररुप धारण केले. तसेच कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे यामुळे आग पसरली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 
- राजेंद्र बैरागी, केंद्रप्रमुख,
अग्निशमन मुख्यालय