Tue, Aug 11, 2020 21:36



होमपेज › Nashik › .. अखेर मिळाले रखडलेले वेतन

.. अखेर मिळाले रखडलेले वेतन

Published On: Dec 18 2017 2:39AM | Last Updated: Dec 17 2017 11:25PM

बुकमार्क करा





नाशिक : विशेष प्रतिनिधी 

आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत  येणार्‍या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक आणि कर्मचार्‍यांचे वेतन दरमहा 1 तारखेला देण्यात यावे, असा अध्यादेश सरकारने दोन वर्षांपूर्वी काढला आहे. या अध्यादेशालाच आव्हान देण्याचा प्रकार नाशिक प्रकल्प कार्यालयात झाला असून, प्रकल्पांतर्गत येणार्‍या 40 अनुदानित आश्रमशाळांतील सुमारे 1000 शिक्षक आणि कर्मचार्‍यांचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्यात आले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर 14 डिसेंबरला हे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात आले.

शिक्षक आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर शासनाने 2015 मध्ये आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत  येणार्‍या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक आणि कर्मचार्‍यांचे वेतन वेळेत करण्याचा अध्यादेश काढला होता. यामध्ये दर महिन्याच्या 15 तारखेला आश्रमशाळेची परिपूर्ण आणि अचुक देयके मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्पाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात यावीत. प्रकल्प अधिकार्‍यांनी ती कोषागाराकडे पाठवून वेतन 1 तारखेलाच होईल याची व्यवस्था करावी आणि देयके न पाठविणार्‍या मुख्याध्यापक आणि अधिकार्‍यांविरोधात विभागीय चौकशीचा इशारा देण्यात आला होता.

नाशिक प्रकल्पांंतर्गत येणार्‍या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापकांनी अध्यादेशानुसार देयके पाठवली. मात्र, प्रकल्प कार्यालयाने कोणतेही स्पष्टीकरण न देता दोन महिन्यांपासून वेतन रोखले. यासाठी स्वाभिमानी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेने सहआयुक्तांची भेट घेतली.त्यानंतर सहआयुक्तांनी प्रकल्पाधिकार्‍यांना पत्र पाठविले. त्याची दखल घेत वेतन बँकखात्यात जमा झाले. मात्र, गेल्या दोन महिन्यांत शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या आर्थिक अडचणीला जबाबदार कोण असा प्रश्‍न संघटना उपस्थित करीत आहेत.