Wed, Jun 03, 2020 22:18होमपेज › Nashik › उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

Published On: Sep 27 2019 2:15AM | Last Updated: Sep 26 2019 11:45PM
नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.27) उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 15 विधानसभा मतदारसंघांत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण खर्‍या अर्थाने तापणार आहे. 

गेल्या आठवड्यात राज्यात विधानसभेचा बिगुल वाजला. निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जाहीर होत असून, त्याच क्षणापासून उमेदवारी अर्जांची विक्री व दाखल करता येतील. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 15ही मतदारसंघांत अर्ज विक्री व दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत अर्ज भरता येतील. नाशिक शहरातील तीन, देवळालीसह इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघाचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल केले जाणार आहेत. उर्वरित 10 मतदारसंघांचे अर्ज हे तेथील प्रांताधिकारी स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवारांसाठी विशेष मदत केंद्रही उभारण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. चौथा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रशासकीय कामकाज बंद असेल. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी 30, 1, 3 व 4 या तारखा उपलब्ध असल्याने या दिवशी उमेदवार शक्‍तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करतील. त्यामुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. शक्‍तिप्रदर्शनावेळी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयापासून शंभर मीटरच्या अंतरावर तीन वाहने आणण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात उमेदवारासह सूचक, अनुमोदक व दोन जण अशा एकूण चार व्यक्‍तींना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

उमेदवार यादीकडे लक्ष

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत असली तरी अद्यापही सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे घोषित करणे टाळले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या मनात धाकधूक कायम आहे. तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. रविवारी (दि.29) किंवा सोमवारी (दि.30) सकाळपर्यंत सर्वच पक्ष त्यांचे उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी दोन दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. 

तर परवानगी आवश्यक 

अर्ज भरण्यासाठी जाताना उमेदवार मोठ्या प्रमाणावर शक्‍तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मात्र, शक्‍तिप्रदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत शक्‍तिप्रदर्शन अथवा रॅलीसाठी कोणीही अर्ज केलेला नसून कोणालाही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरणे प्रक्रिया -27 सप्टेंबर
अर्जाची अंतिम मुदत-4 ऑक्टोबर
अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर
अर्ज माघार - 7 ऑक्टोबर
मतदान - 21 ऑक्टोबर
मतमोजणी - 24 ऑक्टोबर