Sun, Jul 05, 2020 17:11होमपेज › Nashik › नाशिक : 1969 च्या भयंकर महापुराला पन्नास वर्षे पूर्ण; आठवणींनी आजही शहारे

नाशिक : 1969 च्या भयंकर महापुराला पन्नास वर्षे पूर्ण; आठवणींनी आजही शहारे

Published On: Sep 09 2019 1:33AM | Last Updated: Sep 09 2019 1:33AM
नाशिक : प्रतिनिधी

9 सप्टेंबर 1969... वार मंगळवार... नाशिकसह परिसरात पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता.... उलट तासागणिक त्याचा जोर वाढतच चालला होता.... पर्यायाने गंगापूर धरणातून सतत पाण्याचा विसर्ग सुरू होता... गोदेने अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि तिचे पाणी शहरात शिरले. एकच हाहाकार उडाला... जवळपास तीस वर्षांनी नाशिककर महापूर अनुभवत होते...  हा महापूर एवढा भीषण होता की, त्याने क्षणात होत्याचे नव्हते केले. लाखोंचे नुकसान झाले, कित्येकांचे जीव गेले... त्या महापुराला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.  हा महाप्रलय अनुभवणारी  पिढी आता सत्तरीत आहे. त्यानंतर नाशिकमध्ये अनेक पूर येऊन गेले; पण 1969 च्या महापुराच्या आठवणी आजही त्या ज्येष्ठांच्या अंगावर शहारे आणतात.

नाशिक शहराने आजवर पाच महापूर अनुभवले. सन 1939, 1969, 2008, 2016 व 2019...  या सर्वांत महाभयंकर म्हणता येईल असा पूर म्हणजे 1969 चा. ज्येष्ठांच्या आठवणींनुसार, त्या पुराचे पाणी हळूहळू वाढत गेले. भांडीबाजार, सराफ बाजार पाण्याखाली गेला. रामसेतू पुलावरून पाणी फिरले. सरकारवाड्याच्या अनेक पायर्‍या बुडाल्या. बोहोरपट्टीतही पाणी पोहोचले. अनेकांनी त्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यानंतर पुन्हा कधी मेनरोडला पाणी लागले नाही. त्या काळी फारशा सोयी-सुविधा नव्हत्या. बोटी, लाइफ जॅकेट्स नव्हती. पण पट्टीचे पोहणारे भरपूर होते. अशा अनेकांनी स्वत:चे जीव धोक्यात घालून इतरांना वाचविले. घरांच्या दुसर्‍या मजल्यांवरून खाटा खाली सोडून अडकलेल्या माणसांची सुटका करण्यात आली. तरी व्हायचे ते नुकसान झालेच. अनेकांची घरे, दुकाने  अक्षरश: धुवून निघाली. कित्येकांनी आपल्या आप्तांना डोळ्यांदेखत गमावले. पुराच्या पाण्यात अडकलेली व्यक्ती कशी वाहून गेली आणि आपल्याला कसे काहीच करता आले नाही, ही हतबलता व्यक्त करणार्‍या तेव्हाच्या कित्येक कहाण्या अनेकांनी ‘पुढारी’शी बोलताना कथन केल्या. त्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण होत असतानाच गेल्या महिन्यात 4 ऑगस्टला नाशिककरांनी पुन्हा एकदा महापूर अनुभवला. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीच्या आपत्तीतून आपण काही शिकलो नसल्याचेही यातून पुढे आले. 1969 च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण असल्याच्या निमित्ताने त्या वेळच्या  आठवणींना  या अंकात उजाळा देत आहोत. त्या महापुरात आपले प्राण गमावलेल्यांना जणू ही श्रद्धांजलीच!