Tue, May 26, 2020 12:33होमपेज › Nashik › मुलीने वह्या-पुस्तके मागितली ...आणि पित्याने पाजले विष

मुलीने वह्या-पुस्तके मागितली ...आणि पित्याने पाजले विष

Published On: Jul 22 2019 2:03AM | Last Updated: Jul 21 2019 11:45PM
नाशिक : प्रतिनिधी

कुणालाही पटकन खर्‍या वाटणार नाहीत, कुणीही म्हणेल हे कसे शक्य आहे, अशा घटना नाशिकमध्ये एकापाठोपाठ घडत आहेत. तिसरीही मुलगी झाली म्हणून तिची हत्या जन्मदात्या आईने केल्याची जखम खपली धरत असतानाच 14 महिन्यांची लेक सतत आजारी असते आणि रडत असते म्हणून आईने पोटच्या गोळ्याचा गळा अगदी थंड डोक्याने चिरला. दोन्ही घटनांमधील मातेचे हे पातक आज जणू पित्यात शिरले. मुलगी वह्या-पुस्तकं मागत होती आणि पित्याने तिला विषाचा प्याला दिला...

पंढरीनाथ बोराडे (48, रा. शिंदेगाव, नाशिकरोड) असे या घटनेतील पिता तसेच संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला ऋषिकेश हा मुलगा व निकिता ही मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पैकी ऋषिकेश इयत्ता नववीमध्ये, तर निकिता ही बारावीला शिकते आहे. एरवीही या कुटुंबात पंढरीनाथ याच्या व्यसनामुळे वादावादी नित्याची होती; पण शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेदहाच्या सुमाराला या घरात थरार घडला. 

महाविद्यालय सुरू होऊन महिना उलटला तरीही निकिता वह्या, पुस्तकांशिवाय महाविद्यालयात जात होती. सोबतच्या विद्यार्थिनींकडून यावर बोट ठेवले जात होते. मुळात या मुलीलाही अभ्यासात रस... शिकण्यात रस... ती दररोज वह्या-पुस्तकांसाठी वडिलांमागे तगादा लावत होती. आज तरी आणले का, उद्या तरी घेऊन देणार का? म्हणून तिने शुक्रवारी वडिलांना हक्काने, हट्टाने मला एक हजार रुपये द्या असे बजावले. त्याचा पंढरीनाथ बोराडेला राग आला. बोराडे नशेत होता. त्याने मुलीला लाथा मारल्या. बुक्क्यांनी मारले. मुलगी जिवाच्या आकांताने रडत होती आणि पिता पंढरीनाथ तिला मारतच होता. एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही म्हणून की काय तो थेट घराबाहेरील गोठ्यात गेला... आणि तिथून त्याने रोगर कीटकनाशकाची भरलेली बाटली आणली. निकिताच्या तोंडात बळजबरीने ओतू लागला. यावेळी घरात मुलांची आई नव्हती. आरडाओरड ऐकून ती आली. तिनेही आरडाओरड सुरू केली. एव्हाना ऋषिकेशही मदतीला आला आणि ऋषिकेश व निकिताने मिळून पित्याचा प्रयत्न हाणून पाडला. शेजारीही जमले. तेव्हा कुठे पंढरीनाथ आटोक्यात आला. ऋषिकेशने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद नोंदवली.