Tue, May 26, 2020 11:27होमपेज › Nashik › निर्यात बंदीविरोधात शेतकरी रस्त्यावर

निर्यात बंदीविरोधात शेतकरी रस्त्यावर

Published On: Oct 01 2019 2:02AM | Last Updated: Sep 30 2019 11:13PM
नाशिक : टीम पुढारी

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी (दि.30) दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संताप निर्माण झाला. निर्यातबंदीच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करीत शेतकर्‍यांनी घोषणाबाजी केली. पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले.

उमराणे येथे शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. देवळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी हस्तक्षेप करीत शेतकर्‍यांची समजूत काढली. दरम्यान, शासनाने कांदा व्यापार्‍यांना दररोज 500 क्विंटल कांदा शिल्लक ठेवण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

बागलाण तालुक्यातही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. येथील बाजार समितीत लिलाव सुरू होताच शेतकर्‍यांनी आक्रमक होत लिलाव बंद पाडले. त्यानंतर अकरा वाजेपासून शेतकर्‍यांनी सटाणा-मालेगाव मार्गावर रास्ता रोको केला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, मनसेचे शहरप्रमुख पंकज सोनवणे आदींसह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर 600 रुपयांनी घसरले. आठ वाहनांचे लिलाव होताच बाजरभाव कमी झाल्याने शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले. पिंपळगाव बाजार समितीमध्येही हीच परिस्थिती होती. शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले. दोन तासांनंतर शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर जात रास्ता रोको केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जात शेतकर्‍यांची समजूत काढली.