Fri, Jun 05, 2020 06:13होमपेज › Nashik › शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्‍ती हवी : आदित्य ठाकरे

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्‍ती हवी : आदित्य ठाकरे

Published On: Jul 20 2019 2:13AM | Last Updated: Jul 20 2019 2:13AM
धुळे : प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी सरसकट कर्जमुक्‍त झाला पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. राज्यातील काही भागांमध्ये प्रमाणपत्र मिळूनही अनेकांची कर्जमुक्‍ती झालेली नसल्याने आपण मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना केवळ निवडणुकीतच संपर्क करते असे नसून, जनतेमध्येच देव असल्याची शिकवण जोपासणारी असल्याचे प्रतिपादन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने ‘जनआशीर्वाद यात्रे’त दसरा मैदानाजवळील विठ्ठल मंदिरापासून मोटारसायकल रॅलीने यात्रेस सुरुवात करण्यात आली. यावेळी एका बसमध्येे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्यासह खा. संजय राऊत उपस्थित होते.

केंद्रात तुम्ही, राज्यात आम्ही : राऊत 

मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी पुन्हा महाराष्ट्र शिवसेनेचाच असा नारा दिला. आदित्य ठाकरे यांची लाटच असल्याने आगामी काळात लोकसभेत तुम्ही व राज्यात आम्ही असे ठरले असून, राज्यात भगवा झेंडा हा सेनेचाच राहणार असल्याचे सांगितले.

शिक्षणमंत्री होण्यास आवडेल : आदित्य 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी राज्यातील भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणमंत्री होण्यास आवडेल असे सांगून, राज्यात शिक्षण व्यवस्था ही व्यवसाय व नोकरीसाठी उपयुक्‍त बनवली पाहिजे, असे मत व्यक्‍त केले.