Mon, Nov 18, 2019 21:22होमपेज › Nashik › पिंपळगावला शेतकर्‍यांनी महामार्ग रोखला

पिंपळगावला शेतकर्‍यांनी महामार्ग रोखला

Published On: Oct 01 2019 2:02AM | Last Updated: Sep 30 2019 10:48PM
पिंपळगाव बसवंत : मनोज कावळे

केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णय व व्यापारीवर्गाने 500 क्विंटलच्या वर मालाची साठवणूक करण्याच्या जाचक अटींमुळे सोमवारी (दि.30) शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले. त्यानंतर चिंचखेड चौफुलीवर जाऊन शेतकर्‍यांनी महामार्ग रोखला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जाऊन शेतकर्‍यांची समजूत काढली.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यात कांदा प्रतिक्विंटल 4,800 ते 4,450 रुपयांपर्यंत गेला होता. शुक्रवारी कांद्याला 3,876 ते 3,451 पर्यंत दर मिळाला. दोन दिवसांनी त्यात रविवारी निर्यातबंदीचा निर्णय झाला. सोमवारी कांदा लिलाव सुरू होताच 600 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरीवर्गात संतापाची लाट उसळली. यावेळी शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मुंबई-आग्रा महामार्गावर ठाण मांडत आपला रोष व्यक्त केला.

पाच ते सहा महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा हा पावसाच्या वातावरणाने 50 टक्के खराब झाला. बाजारभाव जास्त प्रमाणात वाढले असले तरी हजार ते दीड हजार या दरानेच पैसे पदरात पडत आहे. पुढील महिन्यात नवीन पोळ कांद्याची लागवड होत असते. मात्र, पावसामुळे रोपे खराब झाल्यामुळे कांदा लागवड होणे अशक्यच आहे. 
सध्या साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला असताना केंद्र सरकारने निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय शेतकर्‍यांसाठी मारक आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता कांदा लिलाव सुरू झाले. जवळपास 150 पिकअपचा लिलाव झाला. यामध्ये कांद्याला 2800 ते 3350 रुपये भाव मिळाला. बाजारभावात सुधारणा होईल, या अपेक्षेत शेतकरी असताना ट्रॅक्टर लिलाव सुरू झाले. भावात सुधारणा होत नसल्याचे पाहून शेतकर्‍यांनी थेट लिलावच बंद पाडले. बाजार समितीपासून चार किलोमीटरवर असलेल्या महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक बंद केली. दुपारी दीड वाजता पोलीस उपअधीक्षक अरुंधती राणे यांनी शेतकर्‍यांची समजूत काढून निवेदन घेऊन महामार्ग मोकळा केला.