होमपेज › Nashik › नाशिक : शिंदवड येथे शेतकऱ्याची विष पिवून आत्महत्या 

नाशिक : शिंदवड येथे शेतकऱ्याची विष पिवून आत्महत्या 

Published On: Apr 28 2019 9:11AM | Last Updated: Apr 28 2019 9:11AM
जानोरी : वार्ताहर

शेतीतुन उत्पादन खर्चही निघत नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढतच चालेल्या चिंतेतून एका शेतकऱ्याने द्राक्षबागेचे फवारणीचे विषारी औषध पिवून आपले जीवन संपवले. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील प्रकाश निवृत्ती बस्ते असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. 

प्रकाश बस्ते यांची ३ एकर शेती आहे. मात्र मागील काही काळात शेतीतून पिकवलेल्या पिकाला भाव मिळत नाही. मुलीच्या लग्नाला उसनवारी केल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यात दुष्कळाशी दोन हाथ करताना बस्ते खचले आणि सोण्यासारखं बाजरी पिक शेतात उभं परंतु पाणी नाही त्यामुळे ते हतबल झाले होते. शेतीतुन उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत चालले होते याच निराशेतून बस्ते यांनी द्राक्षबागेचे फवारणीचे नुवान हे विषारी औषध पिवून आपली जिवनयात्रा संपवली.

बस्ते यांनी घरात कोणीही नसताना विषारी औषध सेवन केले. काही वेळाने त्यांच्या पत्नीने बस्ते यांना खोकताना बघितले व आरडाओरडा केला. यावेळी ग्रामस्थांनी मदतीला धावुन येत बस्ते यांना खेडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथुन त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहताच प्रकाश बस्ते यांनी प्राण सोडले. प्रकाश बस्ते यांना पत्नी, दोन मुली एक मुलगा,आई,भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे. 

गारपीठ, दुष्काळ, पिकाला भाव नाही, कर्जमाफी नाही, शेती मालाला अद्याप हमीभाव मिळाला नसुन पोकळ आश्वसनांनी बळीराजा खचत चालला आहे. यामुळेच दिंडोरी सारख्या प्रगतशील तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. यासर्व गोष्टीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गातुन होत आहे.