होमपेज › Nashik › धनगरवाडीत शेतकर्‍याची कर्जास कंटाळून आत्महत्या

धनगरवाडीत शेतकर्‍याची कर्जास कंटाळून आत्महत्या

Published On: Apr 08 2019 1:59AM | Last Updated: Apr 07 2019 11:56PM
सिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळगाव) येथील रमेश मारुती डुंबरे (50) या शेतकर्‍याने विविध प्रकारच्या कर्जास कंटाळून घराजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन रविवारी (दि.7) पहाटे साडेपाच वाजता आत्महत्या केली.

डुंबरे यांनी शेतातील कांदे काढून ठेवली होते. पत्नी जयश्री या सकाळी झोपेतून उठल्यानंतर कांद्यावर पात टाकण्यासाठी शेतात आल्या, त्यावेळी पतीला त्यांनी बांधावर उभ्या अवस्थेत पाहिले. त्यांनी बांधावर काय करतात? असे विचारता त्यांना पतीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन  पाहिले असता त्यांच्या गळ्यात दोरी होती व ते मृतावस्थेत आढळले. नंतर त्यांनी आरडाओरड करून कुटुंबातील व्यक्तींना घटनास्थळी बोलावले. ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली.  पोलीस हवलदार गोरखनाथ बलक व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सिन्‍नरला पाठवून दिले. डुंबरे यांच्यावर सिन्‍नरच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  आत्महत्याग्रस्त रमेश डुंबरे त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.