Fri, Jun 05, 2020 15:46
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › कर्जवसुलीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जवसुलीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Jul 13 2019 1:41AM | Last Updated: Jul 12 2019 11:08PM
मालेगाव : प्रतिनिधी

नापिकी व कर्जाला कंटाळून तळवाडे येथील अपंग शेतकर्‍याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बापू चिंधा अहिरे (53) असे शेतकर्‍याचे नाव आहे. 

दोन्ही पायांनी अपंग असलेल्या आहिरे यांच्याकडे दीड एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. त्यावर सिंडीकेट बँकेचे तीन लाख व विविध विकास सोसायटीचे 25 हजारांचे कर्ज घेतले होते. बँकांच्या पथकाकडून वसुलीसाठी तगादा लावला जातो, असे सांगण्यात येते.

2007 मध्ये त्यांनी सोसायटीमार्फत 10 हजारांचे कर्ज घेतले होते. मुद्दलासह थकीत अशी 25 हजारांची रक्‍कम देणे झाली होती. विशेष म्हणजे यादरम्यान, शासनाकडून कर्जमाफी होऊन त्यांना लाभ मिळालेला नाही. त्याबाबत सातत्याने अहिरेंकडून स्थानिक स्तरावर पाठपुरावा व तक्रारी झाल्या होत्या. सिंडीकेट बँकेने घरबांधणी व पीककर्जासाठी दिलेल्या कर्जाची रक्‍कम तीन लाखांच्या घरात गेली होती. 

बँकांकडून वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. शिवाय पथकाने तगादा लावला होता. कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून अखेर मुलाने आत्महत्या केल्याचे वयोवृद्ध वडील चिंधा अहिरे यांनी सांगितले. 

गुरुवारी (दि. 11) रात्री 11 वाजेच्या सुमारास अहिरे याने शेतमळ्यातील राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंडळ अधिकारी आर. जी. शेवाळे व तलाठी सुदाम हिरे यांनी अहिरे कुटुंबीयांची भेट घेत पंचनामा केला. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी स्थानिक विविध संस्थांच्या प्रमुखांनी केली आहे.