Fri, Jun 05, 2020 06:03होमपेज › Nashik › सुरगाणा तहसीलमध्ये बनावट स्टॅम्प घोटाळा

सुरगाणा तहसीलमध्ये बनावट स्टॅम्प घोटाळा

Published On: Aug 31 2019 1:30AM | Last Updated: Aug 30 2019 11:26PM
नाशिक : प्रतिनिधी

सुरगाण्यात महा-ई-सेवा केंद्रचालकाने तहसीलदारांच्या नावे राजमुद्रा असलेला शिक्का तयार करून त्याचा वापर केल्याची घटना शुक्रवारी (दि.30) उघडकीस आली. तहसीलदार दिगंबर गिते यांनी या प्रकरणाबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणामुळे सुरगाणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सुरगाण्यातील तेली गल्ली येथे सचिन प्रेमानंद सूर्यवंशी यांचे महा-ई-सेवा केंद्र आहे. या केंद्रातून ऑपरेटच्या नावे बनावट रबरी शिक्का तयार करून लॉग इन व आउटचे काम सुरू होते. याबाबत सुरगाणा तहसीलदार प्रशासनाला शंका आल्यानंतर तहसीलदार दिगंबर गिते यांनी केंद्रावर धाड टाकली. यावेळी त्यांना रबरी शिक्के तसेच तहसीलदारांच्या नावे राजमुद्रा असलेला गोल शिक्काही आढळून आला. दरम्यान, या प्रकरणी केंद्रचालक सूर्यवंशी याच्यावर भारतीय राजमुद्रा अधिनियम 2005 आणि ईवायडी अधिनियम 2018 अन्वये सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केंद्रावरून या शिक्क्यांचा वापर करून दाखले वितरित करण्यात आले की काय याबाबतही चौकशी सुरू असल्याचे तहसीलदार गिते यांनी सांगितले. ऑपरेटर्सच्या नावे रबरी शिक्का तयार करण्याचे हे जिल्ह्यातील पहिले प्र्रकरण नाही. दहाच दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील आधार केंद्रात अशाच प्रकारची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर लगेचच हा प्रकार समोर आल्याने  एकूणच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या केंद्रावर बनावट शिक्के तसेच ऑपरेटरकडून बनावट फिंगर प्रिंटचा वापर होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तसेच दाखल्यांसाठी अतिरिक्‍त शुल्क आकारणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने या केंद्राची तपासणी केली असता येथे तहसीलदारांचे बनावट रबरी शिक्के तसेच भारतीय राजमुद्रेचा शिक्का आणि आधार केंद्रावरील रबरी फिंगर प्रिंट आढळून आले असून, या प्रकरणी केंद्रचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दिगंबर गिते, तहसीलदार, सुरगाणा