Tue, May 26, 2020 11:03होमपेज › Nashik › पेरणीनंतर उघड होणार बनावट बियाणे

पेरणीनंतर उघड होणार बनावट बियाणे

Published On: Jul 16 2019 1:59AM | Last Updated: Jul 15 2019 11:33PM
नाशिक : प्रतिनिधी

खरीप हंगामास सुरुवात झाल्यानंतरही रासायनिक खते आणि बियाण्यांचा प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही. बनावट बियाण्यांची पेरणी करून शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग जागा होणार काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी खरीप हंगाम सुरू होण्याआधी बियाणे आणि खतांचे नमुने काढून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. विक्रेत्यांकडून बनावट बियाणे तसेच खतांची विक्री केली जात असून, त्यातून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्याचा हेतू त्यामागे असतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बियाण्यांचे 121 तर खतांचे 25 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविले आहेत. तसेच कृषी अधीक्षक कार्यालयानेही बियाण्यांचे 80 आणि खतांचे 20 नमुने तपासणीला पाठविले आहेत. जून महिना संपून जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. जूनमध्ये पावसाने दांडी मारल्याने पेरण्यांनाही उशिरानेच सुरुवात झाली. सद्यस्थितीत 40 टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे बियाणे आणि खतांचे नमुने मात्र अद्यापही प्रयोगशाळेतच पडून आहेत. तपासणीचा अहवालच प्राप्त न झाल्याने नेमकी कोणते बियाणे बनावट आहे, हे कळू शकलेले नाही. शेतकरी तर पेरणी करून मोकळे झाले आहेत. आता बनावट बियाण्यांची पेरणी झालीच आणि त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान झालेच तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पेरण्या आटोपल्यावर नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यास नमुने तपासणीच्या हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. खरे तर ज्यांच्या खांद्यावर बियाण्यांचे नमुने काढण्याची जबाबदारी आहे, त्या भरारी पथकांची स्थापना करायलाच यावर्षी उशीर झाला. जूनमध्ये हंगाम सुरू होत असल्याने ही पथके मेमध्येच स्थापन होऊन त्यांचे काम सुरू होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र तसे न झाल्याने नमुने काढण्याचे नुसतेच सोपस्कार पार पाडले गेले, असाच अर्थ त्यातून काढला जात आहे.