Wed, Jun 03, 2020 22:31होमपेज › Nashik › माजी सैनिकावर हल्ला; आ. उन्मेष पाटलांवर गुन्हा दाखल

माजी सैनिकावर हल्ला; आ.उन्मेष पाटलांवर गुन्हा

Published On: May 08 2019 12:11AM | Last Updated: May 08 2019 2:09AM
जळगाव : प्रतिनिधी

माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आमदार उन्मेष पाटलांसह इतरांवर आज कोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, माजी सैनिक सोनू हिंमत महाजन यांच्यावर २ जून २०१६ रोजी तालुक्यातील टाकली प्र.चा. येथे प्राणघातक हल्ला झाला होता. यात आमदार उन्मेष पाटील यांनी धमकावून त्यांच्यासह मुकुंद भानुदास कोठावदे, भावेश मुकुंद कोठावदे, भारती मुकुंद कोठावदे, पप्पू मुकुंद कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे व जितेंद्र वाघ यांनी सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. यात भावेश कोठावदे याने त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केला होता. यानंतर भावेश कोठावदे याने मनीषा सोनू महाजन यांच्या १४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून घेतली. तर मुकुंद कोठावदे याने सोनू महाजन यांच्या खिशातील २७०० रूपये काढून घेतल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. मात्र यावरून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे सोनू महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने ३० एप्रिल रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

खंडपीठाच्या निर्देशानुसार आज चाळीसगाव पोलिस स्थानकामध्ये मनीषा सोनू महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकुंद भानुदास कोठावदे, भावेश मुकुंद कोठावदे, भारती मुकुंद कोठावदे, पप्पू मुकुंद कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे व जितेंद्र वाघ यांच्यासह आमदार उन्मेष भैयासाहेब पाटील यांच्या विरूध्द गुरक्र. १६२/२०१९ कलम ३०७,३९५,३२४,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ सह आर्म ऍक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत. 

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून यात उन्मेष पाटील हे जनतेचा कौल मागत आहेत. या निकालाआधी त्यांच्यावर ३०६ सारख्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याआधी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे पोलिस प्रशासन आता तरी संबंधितांना अटक करण्यासाठी त्वरा दाखविणार का ? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.