Wed, Jun 03, 2020 09:23होमपेज › Nashik › इगतपुरी : समृध्दी महामार्गावरील अतिरिक्त ब्लास्टींगमुळे घरांना मोठे तडे 

इगतपुरी : समृध्दी महामार्गावरील अतिरिक्त ब्लास्टींगमुळे घरांना मोठे तडे 

Published On: Jul 11 2019 3:59PM | Last Updated: Jul 11 2019 3:10PM
इगतपुरी : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातुन मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग जात असुन या मार्गाचे फांगुळगांव जवळ  १३ किमी बोगद्याचे काम सुरू आहे. शासनाने या कामासाठी ब्लास्टींगची मर्यादा ठरवुन दिली आहे. मर्यादेनुसार ब्लास्टिंग करावी असा आदेश असूनसुध्दा सदर ठेकेदार या ठिकाणी मर्यादेपेक्षा अतिरिक्त ब्लास्टींग करत असल्याने आजुबाजूच्या घरांना मोठे तडे गेले आहेत. मातीचे ढिगारे साचले असल्याने गेल्या दोन दिवसांपासुन पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे फांगुळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने रस्ता बंद झाला आहे. नागरिकांच्या घरात व येथील शाळेत पाणी शिरल्याने नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. 

ब्लास्टींगचा फटका येथील रहीवासी प्रकाश आडोळे व म्हादू आडोळे यांच्या घरांना बसला असून त्यांच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी इगतपुरी तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मात्र, समृध्दी महामार्गाचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. येथील बरेच विद्यार्थी व विद्यार्थीनी कॉलेज व शाळेसाठी याच एकमेव रस्त्याचा वापर करीत असल्याने शालेय शिक्षण घेण्यासाठी हाल होत आहे. म्हणुन रस्त्यावरील मातीची ढिगारे त्वरित हटवुन रस्ता मोकळा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

समृध्दी महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे या भागातील रस्त्यावर नेहमी पाणी साठत असल्याने इगतपुरीला जाण्यासाठी नागरिक, विद्यार्थी व वाहन धारक यांना त्रास होत आहे. समृध्दी महामार्गाच्या प्रशासनाने वेळीच दगड व माती हटवुन रस्ता सुरळीत करण्यात यावा.

-धनराज म्हसणे, ग्रामस्थ फांगुळगाव

 

समृध्दीच्या या कामामुळे आमच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून ऐन पावसाळ्यात घरे गळत असुन भिंतीनांही ओल आल्याने कधी भिंत पडेल याचा नेम नाही. ओल्या भिंतीमुळे यावर विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असुन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण ? झोपतांना भीती वाटते.
-प्रकाश आडोळे, पीडित ग्रामस्थ.