Tue, Nov 19, 2019 00:17होमपेज › Nashik › बनावट कागदपत्रांद्वारे लष्करात भरती उघड

बनावट कागदपत्रांद्वारे लष्करात भरती उघड

Published On: Jan 25 2018 1:49AM | Last Updated: Jan 25 2018 1:49AMनाशिक : प्रतिनिधी 

मागील काही दिवसांपासून बनावट कागदपत्रे सादर करुन लष्करात भरती झाल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. असेच आणखी एक प्रकरण समोर आले असून, नाशिक आर्टिलरी सेंटर येथे रक्‍त नात्यातील भरतीत दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून लष्कराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. डीएमटी राहुल भाटी, सुखविर सिंग (रा.सतवारी, ता.कन्‍नोज, रा.उत्तर प्रदेश) व सूर्यप्रकाश राजेंद्र प्रसाद (रा.आश्‍वल धानी, ता.झुनझुनू, रा.राजस्थान) अशी संशयितांची नावे असून, या दोघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

29 नोव्हेंबर 2016 ला नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर येथे रक्‍त नात्यातील भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात (15248078) रिक्रूट डीएमटी राहुल भाटी सुखविर सिंग याने भरतीसाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविली तर, आर्मी.नं. (15248648) रिक्रूट सूर्यप्रकाश राजेंद्र प्रसाद याने त्याचा भाऊ रविप्रकाश राजेंद्र याचे कागदपत्रांचा वापर केला. तसेच, रविप्रकाश राजेंद्र प्रसाद या नावावर नोकरी मिळवली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर ताराचंद बापूराव इंदापूर (राहणार ए.टी.आर. एन.आर.सी.सेंटर आर्टिलरी सेंटर ) यांनी वरील दोघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे सादर करून लष्कराची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक हिरे हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत. यापूर्वीदेखील भरतीसाठी उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण समोर आले होते.